भिरवंडे वनपरिमंडळाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा
कणकवली (प्रतिनिधी) : वन्यजीव हे निसर्गसाखळी चे महत्वाचे घटक आहेत. वन्यप्राणी हे मानवाचे शत्रू नसून मित्र आहेत. वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन कणकवली तालुक्यातील भिरवंडे वनपरिमंडळ च्या वनपाल कुसुम कांबळे यांनी शालेय विद्यार्थ्यांना केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असून वन्यजीव सप्ताह च्या निमित्ताने वनपाल कुसुम कांबळे यांनी भिरवंडे जिल्हा परिषद शाळा नं 1 येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच वनरक्षक भिरवंडे सुखदेव गळवे, वनरक्षक नाटळ पूजा चव्हाण, वनमजुर महादेव गुडेकर, दिलीप गावकर, राघो तांबे आदी उपस्थित होते. वन्यप्राणी ,मनुष्य हे निसर्गाच्या अन्नसाखळी चे घटक आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यप्राण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.त्यामुळे वन्यप्राण्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संघर्ष होऊ नये यासाठी आपण खबरदारी घ्यायला हवी. जर वन्यप्राणी मनुष्यवस्तीत आलाच तर अशा वेळी कोणती खबरदारी घ्यावी ? वनविभागाशी कसा संपर्क साधावा याबाबत वनपाल कुसुम कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.