चौके (प्रतिनिधी) : माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय कला उत्सव २०२४-२५ स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 26 सप्टेंबर रोजी कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव २०२४-२५ या स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची विद्यार्थिनी कुमारी श्रेया समीर चांदरकर हिने त्रिमित्त शिल्प या प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच कुमारी ममता महेश आंगचेकर हिने साकारलेल्या द्वीमित चित्रास जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला. दिनांक १६ते १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धेसाठी कुमारी श्रेया समीर चांदरकर हीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी मार्गदर्शन केले. या दोन्हीही विद्यार्थिनींचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे व सर्व शिक्षक ,कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड.एस. एस .पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, संस्था सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव एस.डी. गावडे, खजिनदार रविंद्र पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.