कणकवली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडीचा गुन्हा 72 तासात उघड

कणकवली (प्रतिनिधी) : बँकेच्या ताब्यातील फ्लॅट फोडल्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा अवघ्या 72 तासांत कणकवली पोलिसांनी छडा लावला असून आरोपी परशुराम आप्पा बांदिवडेकर,38 वर्षे,रा-कलमठ गावडेवाडी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे. कणकवली पोलीस ठाणेस फिर्यादी इसम नामे नितीनकुमार शिवाजी चौगुले, वय 38 वर्षे, रा-कणकवली शिवशक्तीनगर, ता-कणकवली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 11/10/2024 रोजी गुन्हा रजि.क्र. 291/24,BNS,2023 चे कलम 331(3),331(4),305,62 प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्यांमध्ये फेडरल बँक लिमिटेड शाखा कणकवली या बँकेने थकीत कर्जदार सुरेश हरी सुतार व सहकर्जदार सौ अर्चना सुरेश सुतार,दोन्ही रा- कणकवली यांचे नावे असलेली वाणिज्य वापर बिल्डिंग नंबर 1385 येथील कारखाना रीतसर 2016 रोजी ताब्यात घेतलेला होता. दिनांक 25/9/2024 रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने कारखान्याच्या पाठीमागील लोखंडी शटरचे सील असलेले कुलूप तोडून त्या शटरद्वारे कारखान्यात प्रवेश करून चोरी केली म्हणून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सीसीटीव्हीतून घेतला आरोपीचा शोध

गुन्ह्याच्या घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी इसम हा चोरी करताना दिसून आला. त्यावरून तात्काळ कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या आरोपी इसमाची स्थानिक खबऱ्यामार्फत ओळख पटवून त्याचा शोध सुरू केला. परंतु पोलीस आपला शोध घेत आहेत हे समजताच सदरचा आरोपी इसम हा पळून जाऊ लागला. स्थानिक खबऱ्यामार्फत आरोपी इसम हा मोटारसायकलवरून पळून जात असल्याची माहिती प्राप्त होताच तात्काळ पोलीस उपनिरीक्षक हाडळ,पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीकरिता पोलीस ठाण्यास आणले. सदरची कामगिरी ही उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली घनश्याम आढाव, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे व पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!