निलेश राणेंच्या शिवसेना पक्षप्रवेशावर उपरकरांनी केला सवाल
कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री शिंदे आज भाजपा पदाधिकारी निलेश राणे यांना शिवसेनेत पक्षप्रवेश देत आहेत. या पक्षप्रवेशासाठी उमेद मधील कर्मचारी आणि महिलांना या प्रवेश सभेला येण्यासाठी प्रत्येकी दीड हजार रुपये देऊन जबरदस्तीने सभास्थळी येण्यासाठी सांगितले जात आहे. सध्या भातकापणी चा हंगाम सुरू असून सतत कोसळणाऱ्या पावसाने आज उघडीप दिली आहे. असे असताना उमेद महिला कर्मचाऱ्यांना सभेला बोलावल्यामुळे शेतीकाम राहत आहे. ह्या भात कापणीला भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जाणार आहेत काय ? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. हा आचारसंहितेचा भंग असून याची तक्रार जिल्हाधिकारी आणि सीइओ यांच्याकडे करणार असल्याचेही उपरकर म्हणाले. तसेच शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या निलेश राणे यांनी स्व.बाळासाहेब ठाकरेंबद्दल सोनू निगम प्रकरण आणि आनंद दिघे मृत्यू बाबत जे अश्लील आणि वादग्रस्त आरोप केले होते त्याबद्दल काय सांगणार, असा सवालही उपरकर यांनी केला. आम्ही ठाकरे सेनेत प्रवेश केल्यानंतर कणकवलीत श्रीधर नाईक हत्येबाबत आमदार नितेश राणेंकडून लावलेले बॅनर म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांवर श्रीधर नाईक हत्येबाबत केलेलं प्रश्नचिन्ह आहे. कारण श्रीधर नाईक हत्येत नारायण राणे हे स्वतः आरोपी होते.