राखायला हवी निजखूण च्या मुखपृष्ठासाठी चित्रकार नामानंद मोडक यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
कणकवली (प्रतिनिधी) : कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सांगली येथील सारांश या आंतरराज्य मासिकाचा राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठ निर्मितीसाठी सुप्रसिद्ध चित्रकार नामानंद मोडक यांना सारांश मासिकाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सारांश मासिक चे संपादक डॉ. अनिल दबडे , उपसंपादक डॉ.विजयकुमार माने यांनी या पुरस्काराची घोषणा केली.पुणे येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे. संयत विद्रोहाची नवीन परिभाषा सांगणारा काव्यसंग्रह अशा शब्दांत राज्यभरातील नामवंत समीक्षकांकडून राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह वाखाणला गेला आहे. या काव्यसंग्रहास याआधीही राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सारांश मासिक तर्फे कथा, कविता, प्रवासवर्णन, मुखपृष्ठ, विशेष पुरस्कार आदी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. परीक्षण जेष्ठ साहित्यीक श्रीराम पचिंद्रे, मुबारक अमराणी, डॉ.विजयकुमार माने यांनी केले. या पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.