नायब तहसीलदार सह शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी जामीन मंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार श्री हजारे व तलाठी श्री राठोड या शासकीय कर्मचाऱ्यांना ते शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणले प्रकरणे न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकित नाईक, स्नेहांकित बांदेकर, वैभव देसाई, जागृत परब, साईराज अणावकर, संतोष मठकर, बिनयकुमार सिंग, संदीपकुमार सिंग आदी अकरा आरोपींची सिंधुदुर्गनगरी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपीच्यावतीने वकील संग्राम देसाई, सुहास सावंत, अविनाश परब, यतीश खानोलकर, चैतन्य परब, सुशांत घाडीगावकर यांनी काम पाहिले.

1 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11 वाजताचे सुमारास मालवण कुडाळ रस्त्यावरील कुडाळ केळबाईवाडी स्मशानभूमी येथे ही घटना घडली होती. यातील फिर्यादी तलाठी राठोड व नायब तहसीलदार श्री हजारे बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई करण्याचे उद्देशाने गस्त घालीत असताना त्यांनी कुडाळ केळवाईवाडी स्मशानभूमीकडे यातील आरोपी संतोष मठकर बिनयकुमार सिंग, संदीपकुमार सिंग व अन्य एक आरोपी घेऊन जात असलेले चार वाळूचे डंपर कारवाई करणे करिता थांबविले व त्यांचेवर अनधिकृत वाळू वाहतुकी संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी यातील आरोपी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकित नाईक, स्नेहांकित बांदेकर, वैभव देसाई, जागृत परब, साईराज अणावकर हे चार चाकी व दुचाकी गाडी घेऊन त्या ठिकाणी आले. या सर्वांनी एकत्रित जमाव करून फिर्यादी राठोड व नायब तहसीलदार हजारे यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांचा मोबाईल काढून घेतला. तसेच त्यांचे हातातील जप्तीनामा काढून घेऊन त्यांना लाथाबुक्याने मारहाण करून त्यांना त्यांचे नियमित शासकीय कर्तव्य पार पाडणे पासून अटकाव केला, अशा आशयाची तक्रार फिर्यादी राठोड यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे दिलेली होती.

याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी आरोपी विरोधात फिर्याद दाखल करून घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्या प्रकरणी अक्षय वालावलकर, गौरव ठाकूर, अमोल ठाकूर, अंकित नाईक, स्नेहांकित बांदेकर, वैभव देसाई, जागृत परब यांना 4 फेब्रुवारी 2023 रोजी अटक झालेली होती. त्यांना कुडाव न्यायालयाने 8 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 8 फेब्रुवारी रोजी कुडाळ न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तर यातील आरोपी साईराज अणावकर, संतोष मठकर, बिनयकुमार सिंग, संदीपकुमार सिंग यांना 13 फेब्रुवारी रोजी अटक झालेली होती। न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना त्यादिवशी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याप्रकरणी आरोपीने जामीन मिळणे करिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने हा अर्ज मंजूर करीत त्यांची सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!