नागरिकांना करावा लागणार भीषण पाणी टंचाईचा सामना ….
चिंचवली ग्रा.पं.च्या वतीने कणकवली तहसीलदार याना निवेदन सादर
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण या गावातून वाहणारी व विजुदुर्ग वाघोटन खाडीला जावून मिळालेल्या शुक नदीच्या पाण्याची पातळी सद्या झपाट्याने घटली असून या नदीच्या काठावर असलेल्या विविध गावातील शेतकऱ्यांनी आपले खाजगी कृषी पंप शेती साठी लावले असल्या कारणाने पाण्याचा भरमसाठ वापर होत आहे.व परिणामी नदीच्या पाण्याची पातळी घटत जाऊन भीषण पाणी टंचाईला नागरिकांना समोरे जावे लागणार आहे.
याबाबत नुकतेच लेखी निवेदन कणकवली तालुक्यातील चिंचवली गावच्या ग्रामपंचायतीने सरपंच अशोक पाटील यांच्या सहिने लेखी निवेदन कणकवली तहसीलदार कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना दि. १५ /४/२०२४ रोजी देण्यात आले आहे. तर शुक नदीच्या पाण्यावर आजुबाजूच्या अनेक गावच्या ग्रामपंचायत नळ योजना कार्यरत पाण्याच्या अतिरिक्त उपसामुळे नदीच्या पाण्याची पातळी घटल्यामुळे त्यावर सलग्न असलेल्या विहिरीचे पाणी देखील कमी झाले आहे. परिणामी नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
शुक नदीच्या काठावर सद्या मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जात असून त्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. तर वाढता उष्मा आणि वातावरणात होणारे नैसर्गिकच अचानक होणारे बदल यामुळे देखील पाण्याची पातळी खालावत असून पाणी जपून वापरले पाहिजे व उन्हाळी शेतिसाठी वापरण्यात येणारे सर्व कृषी पंप काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावेत. व भविष्यात होणारी भीषण पाणी टंचाई टाळण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कणकवली तहसीलदार याना देण्यात आले आहे.
तसेच चिंचवली, नडगिवे, शेर्पे, तीथवली, बेर्ले व कुरगवणे आदी अनेक गावातील नागरिकांना शुकनदीच्या पाण्याचा लाभ होत असून, चिंचवली व शेर्पे या दोन ग्रामपंचायतीच्या नदीत असणाऱ्या जॅकवेलला पाण्याच्या कमी झालेल्या पातळीचा फटका बसला असून पाणी पुरवठा व्यवस्थेत अडथळा निर्माण होत आहे.तर बेर्ले व कुरगवणे येथील नागरिकांनी पाण्या अभावी शेती करण्याचे सोडून दिले आहे.
“सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या बोर्डवर वाहणारी खारेपाटण येथील शुक नदीवरील जोडण्यात आ दोन्ही जिल्ह्यातील गावचे मोटर पंप तसेच नैसर्गिक प्रवाह नद्या, तलाव यावर बसवलेले पाणी उपसा मोटार पंपाबाबत शासनाने योग्य ती कार्यवाही करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी चिंचवली येथील ग्रमस्थ दत्तात्रय सत्यविजय भालेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे राजपुर तहसीलदार यांचेकडे केली आहे.