खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

इयत्ता चौथीचा शुभेच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : येथील शेठ न.म. विद्यालय खारेपाटणच्या प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ येथील कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी भूषवले. याप्रसंगी व्यासपीठावर शेठ न.म. विद्यालय व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, सीनियर कॉलेजचे प्राचार्य ए.डी.कांबळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक संतोष राऊत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वृषाली दर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक वर्ग, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. सदर प्रसंगी विद्यार्थ्यांच्यात समाधान ओसंडून वाहत होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना पुढील शिक्षण याच शाळेत घेणार असल्याचे आवर्जून सांगितले. महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेचे बक्षीस वितरणही याप्रसंगी करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिला. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. प्रमुख पाहुणे आदिनाथ कपाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा देताना प्राथमिक विभागाच्या स्टाफचेही कौतुक केले व या प्रशाळेतून वेगवेगळ्या आघाड्यांवर देशाचे नेतृत्व करणारे नागरिक घडतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात प्रवीण लोकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राथमिक विभाग अनुदानित करण्यासाठी संस्था स्तरावरून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आभार प्रदर्शनाने सदर कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिन काझी यांनी व आभार प्रदर्शन श्रीमती अंकिता सावंत यांनी केले.

error: Content is protected !!