भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचे सुशांत नाईक यांना प्रतिउत्तर
कणकवली (प्रतिनिधी) : वैफल्यग्रस्त होऊन आमदार वैभव नाईक यांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांचे बंधू सुशांत नाईक आता वायफळ बडबड करू लागले आहेत. शिल्लक सेनेच्या सभेला भाजपा कार्यकर्त्यांना जाण्याची गरज नाही. कारण ज्या पक्षात कार्यकर्ते राहिलेत नाहीत अशा पक्षाच्या सभेला जाण्याचे आव्हान देणाऱ्या सुशांत नाईक यांनी अगोदर आमदार नितेश राणे यांनी तुमचा उरला सुरला पक्ष संपवला. रोज पक्षप्रवेश घेत तुमच्याकडे आता कोणी उरले नाही हे दाखवून दिले. त्यामुळे अशावेळी सुशांत नाईक यांनी वायफळ बडबड करून आपली प्रसिद्धी करून घेऊ नये असा टोला भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी लगावला. आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात कुडाळ मालवण मध्ये निर्माण झालेले वातावरण पाहूनच नाईक कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आतापर्यंत दहशतवाद या नावाने डंका पीटायचा व मते मिळवायची हीच रणनिती आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मध्ये वापरली. कणकवली मध्ये देखील कुठेतरी वातावरण बिघडवून सहानुभूती मिळवण्यासाठी सुशांत नाईक यांच्या आव्हानाचा स्टंट आहे. मात्र अशा फालतू आव्हानाला भाजपा मानत नाही. व विचारातही घेत नाही. दहशतवाद हा मुद्दा आता चावून चोथा झाल्याने नाईक आपली शेवटची फडफड करत आहेत. मात्र मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग सह रत्नागिरी जिल्हा उभा राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पराभूत उमेदवाराच्या किरकोळ पदाधिकाऱ्यांनी आव्हानाची भाषा करून आपली लाल करून घेऊ नये. ज्याला कणकवली नगरपंचायत चे बजेट समजत नाही तो राणेंच्या खात्यावर बोलणे हे हास्यास्पद असल्याचा असा टोला अण्णा कोदे यांनी लगावला.