शासकीय विकासनिधी तुमच्या बापजाद्याची प्रॉपर्टी आहे काय ?

राणेंनी 35 वर्षांत केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला

कार्यकर्त्याना दम द्याल तर गाठ आमच्याशी

शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणेंचा राणे-पितापुत्रांवर हल्लाबोल

कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंनी 35 वर्षे कोकणात एकहाती सत्ता असूनही विकासकामे केली नाही आणि आता विकासासाठी स्वतःला निवडून द्या म्हणून जनतेला राणे फसवत आहेत. भाजपात प्रवेश केला तरच विकासनिधी देईन अशी धमकी सरपंचांना द्यायला शासकीय विकासनिधी म्हणजे तुमच्या बापजाद्याची इस्टेट वाटली काय ? राणेंनी पुन्हा कार्यकर्त्याना दमबाजी करायला सुरवात केली आहे. कार्यकर्त्याना दम द्याल , त्यांच्या घराकडे वाकड्या नजरेने बघाल तर याद राखा गाठ आमच्याशी आहे अशा शब्दांत शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे यांनी राणे पितापुत्रावर निशाणा साधला. इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचार सभेत आवेशपूर्ण भाषण करताना शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे यांनी महायुती उमेदवार नारायण राणेंवर सडकून टीका केली. नारायण राणेंनी 35 वर्षांच्या एकहाती सत्ताकाळात आजवर फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला.स्वतःच्या मालकीचे खाजगी मेडिकल कॉलेऊ, इंजिनिअरिंग कॉलेज , गाड्यांचे शो रूम उभारुन राणे कुटुंबाचा व्यवसाय वाढवला.स्वतःच्या टिल्या पुत्राला आमदार केलात. विकासनिधी आम जनतेच्या टॅक्स मधून उभा राहतो.शासकीय विकासनिधी हवा असल्यास भाजपात प्रवेश करा, भाजपला मतदान करा म्हणणाऱ्या आमदार नितेश राणें हा शासकीय विकासनिधी स्वतःच्या बापजाद्याची प्रॉपर्टी समजतात काय ? असा रोकडा सवालही अतुल रावराणे यांनी केला. लोकसभा निडणुकीत स्वतःची घडी बसत नसल्यामुळे आता राणेंकडून पुन्हा कार्यकर्त्याना दमबाजी केली जात असल्याचे ऐकायला मिळत आहे. एकाही कार्यकर्त्याला हात लावाल, त्यांच्या घराकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे अशा शब्दांत अतुल रावराणे यांनी राणेंना आव्हान दिले. भाजपकडे स्वतःचे संघटन नाही. स्वतःला जगातील एक नं चा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपने देशभरात लोकसभेला 145 उमेदवार अन्य पक्षातून आयात केलेले उभे केले आहेत. अन्य पक्षातील नेत्यांना ईडी, इन्कम टॅक्स सीबीआय ची धमकी देत ब्लॅक मेल करून भाजपात यायला मोदी शहा जोडीने भाग पाडले. भाजपाच्या या कुटील कारस्थानांविरोधात पुन्हा एकदा क्रांती घडवून भाजपला पराभवाची धूळ चारून इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याना विजयी करूया असे आवाहन अतुल रावराणे यांनी केले.

error: Content is protected !!