भाजपने, ए, बी, सी अशा याद्या करून मतदारांचा ठरविला दर ; दिवसाढवळ्या पैशांचे वाटप
गद्दार आमदार पन्नास खोक्यांसाठी विकले गेलेत पण कोकणची स्वाभिमानी जनता पैशाला कधीच विकली जाणार नाही…!!!
आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला विश्वास
कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाची चाहूल लागल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपकडून निवडणूक काळात पैशांचे वाटप सुरु झालेले आहे. सगळ्या शासकीय यंत्रणा भाजपच्याच ताब्यात असल्यामुळे दिवसाढवळ्या सर्रासपणे मतदारांच्या ए, बी, सी अशा याद्या करून ‘ए’ यादीतील मतदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये, ‘बी’ यादीतील मतदारांना एक हजार रुपये आणि ‘सी’ यादीतील मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपये अशा दराने पैशांचे वाटप सुरु आहे. भाजपच्या नेत्यांना कोकणातील मतदार बाजारात विकत घ्यायची वस्तू वाटत आहेत का…? कोकणातील जनता भलेही पैशाने गरीब असेल पण विकाऊ नक्कीच नाही. कोकणातील स्वाभिमानी जनतेला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडताना भाजपने पन्नास-पन्नास खोके देऊन चाळीस गद्दार आमदारांना विकत घेत सुरतमार्गे गुवाहाटीला पळवले होते. अशा प्रकारे पन्नास कोटी रुपयांना गद्दार आमदार विकले गेल्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार पडले. आता भाजपचा समोरच्याला विकत घेण्याचा आत्मविश्वास वाढल्यामुळे थेट सरसकट मतदारांनाच विकत घेण्याचा अभूतपूर्व प्रयोग रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केला जात आहे. कोकणच्या जनतेला विकाऊ समजणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जन्माची अद्दल घडवणे गरजेचे आहे. त्यासाठीच धनशक्तीच्या जोरावर जनशक्तीला पराभूत करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडायला हवा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत सरासरी ९ लाख एवढे मतदान झाले. आता ९ लाख मतदारांना सरासरी प्रत्येकी एक हजार रुपये वाटायचे झाले तर ९० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातले ठाकरे सरकार पाडताना भाजपने एक-एक आमदार ५०-५० कोटी रुपये देऊन खरेदी केला होता. अदानी-अंबानींसारख्या उद्योगपतींसाठी काम करणाऱ्या भाजपला मतदारांना विकत घेण्यासाठी ९० कोटी रुपयांची तरतूद करणे ही फार मोठी गोष्ट नाही. दीड महिन्यापूर्वी देशातला सर्वात मोठा निवडणूक रोख्यांचा घोटाळा सर्वोच्च न्यायालयाने उघडकीस आणला आहे. त्यामध्ये भाजपने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्ससारख्या यंत्रणांचा वापर करून गेल्या पाच वर्षात ६ हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे गोळा केल्याचे उघडकीस आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात हे ९० कोटी रुपये याच ६००० कोटी रुपयातून वाटपासाठी आलेले आहेत. भाजपने निवडणुकीपूर्वीच इन्कम टॅक्सची नोटीस पाठवून काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची बँक खाती गोठवली. सुप्रीम कोर्टात धाव घेऊन काँग्रेसला आपली सील केलेली बँक खाती सुरु करून घ्यावी लागली. विरोधी पक्षाला निवडणूक खर्चासाठी पैसेच मिळू नयेत यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून तजवीज करणे आणि त्याच वेळी आपण उद्योजकांकडून निवडणूक रोखेरूपी उकळलेल्या खंडणीतून मतदारांना हजार रुपयात विकत घेऊन निवडणूक जिंकणे, ही भाजपची पद्धत राहिलेली आहे. ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हीच भाजपची निवडणुकांमधील रणनीती आहे. गुजरातमधील सुरत येथे काँग्रेस उमेदवारासाठी ज्यांनी सूचक म्हणून सह्या केल्यात त्याला भाजप उमेदवाराने एका रात्रीत पैशांनी विकत घेऊन गायब केले आणि दुसऱ्या दिवशी निवडणूक अर्जातील सूचकांच्या सहीवर हरकत घेऊन काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक अर्ज बाद केला. त्यानंतर भाजप उमेदवाराने अपक्ष उमेदवारांना विकत घेऊन सुरत मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध पद्धतीने जिंकली. मध्यप्रदेश मधील इंदोर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराला पैसे देऊन अर्ज मागे घ्यायला लावला आणि स्वतःसाठी निवडणूक एकतर्फी केली. यावरून एकंदरीतच भाजपची मानसिकता दिसून येते. संपुर्ण देशभरात भाजपच्या हुकूमशाही विरोधात जनमत तयार झाल्यामुळे सर्वत्र भाजपच्या उमेदवारांकडून रडीचे डाव खेळले जात आहेत. एक तर पैसे देऊन समोरच्या विरोधी उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावून निवडणूक जिंकायची, विरोधी उमेदवाराच्या अर्जात पैशांचा वापर करून तांत्रिक अडचणी निर्माण करून निवडणूक जिंकायची आणि विरोधी उमेदवार प्रामाणिक असेल तर मतदारांना हजार रुपयांना विकत घेऊन निवडणूक जिंकायची. अशा प्रकारे मतदारांना पैशाने खरेदी करून निवडणूक लढवण्याची कीड कोकणात आली आहे आणि ही कीड इथल्या मतदारांना लागायच्या अगोदरच तिचे समूळ उच्चाटन करणे ही काळाची गरज बनली आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघात भाजपचे प्रमोद जठार विजयी झाले आणि राणेसमर्थक उमेदवार रवींद्र फाटक यांचा अवघ्या ३४ मतांनी पराभव झाला. त्या निवडणुकीत रवींद्र फाटकांनी राणेसमर्थक कार्यकर्त्यांना अमाप पैशांचे वाटप केले होते. निवडणूक निकालानंतर ज्या कार्यकर्त्यांच्या विभागात रवींद्र फाटक यांना कमी मतदान झाले त्याठिकाणी ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून वाटण्यासाठी पैसे घेतले होते, त्यांच्याकडून पैसे पुन्हा परत मागण्यात आले. बाळा वळंजूसारख्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पैसे खर्च झाल्याचे सांगून पैसे परत देण्यास नकार देताच त्यांचा मुंबईमध्ये आगीत भाजुन संशयास्पदरीत्या मृत्यु झाला. त्यांच्या मृत्यूनंतर खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी बाळा वळंजूसोबत उपस्थित असलेल्या एका मोठ्या नेत्याच्या पायावर हल्लेखोरांनी ऍसिड ओतले होते. फक्त भाजलेला पाय घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याने तो नेता जीवानीशी वाचला. बाळा वळंजुच्या मृत्यूनंतरही निवडणुकीत वाटलेल्या पैशांची रिकव्हरी होत नाही म्हणून सुदन बांदिवडेकरांसारख्या कार्यकर्त्याची कणकवलीच्या भर बाजारपेठेत मारेकऱ्यांनी तलवारी घेऊन पाठलाग करत बोटे छाटली होती. त्यादिवशी सुदन बांदिवडेकरांच्या जीवावर बेतले होते पण ते बोटांवरच निभावले. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की आता लोकसभा निवडणुकीत दस्तरखुद्द नारायण राणे स्वतः उमेदवार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी लाट असल्यामुळे त्यांचा पराभव होणार हे सुद्धा सूर्यप्रकाशाचाइतके लख्ख दिसत आहे. अशा परिस्थितीत त्यांचे पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पैसे स्वीकारणाऱ्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नारायण राणे पुन्हा एकदा बूथवाईज हिशोब करायला बसणार आहेत ही गोष्ट नीट लक्षात ठेवावी. ज्या बुथवर कमी मतदान होणार त्या बुथमध्ये पैसे वाटणारा कार्यकर्ता आणि पैसे स्वीकारणारा मतदार यांची ए, बी, सी अशी विभागणी केलेली यादी त्यांच्या हातात असणार आहे. त्यामुळे ४ जूनला लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाल्यानंतर पैसे वाटणारा किंवा पैसे स्वीकारणारा यांच्यापैकी कुणीही संभाव्य बाळा वळंजू किंवा सुदन बांदिवडेकर होऊ शकतो. त्यासाठी आताच योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोकणची स्वाभिमानी जनता गद्दार आमदारांप्रमाणे पैशांसाठी विकली जाणार नाही हे अधोरेखित करण्यासाठी ७ मे रोजी पैसे वाटून कोकणच्या जनतेला खरेदी करू पाहणाऱ्या भाजप पक्षाला आणि नारायण राणेंना कोकणातून तडीपार करा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी जनतेला केले आहे.