तथागत गौतम बुद्ध आणि विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंतीमहोत्सव संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : भरणी बौद्ध विकास मंडळ मुंबई आणि ग्रामीण शाखा तसेच पंचशिला महिला मंडळ भरणी यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध आणि विश्वभूषण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंतीमहोत्सव भरणी बौद्धवाडी, ता.कुडाळ येथे नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका कल्पना मलये उपस्थित होत्या. मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी फार मोठे कार्य केले असून संविधानाद्वारे त्यांनी सर्व भारतीयांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला आहे संविधानाच्या विचारानुसार चालणे ही आजची काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणारी व्यक्ती जर चुकीची असेल तर त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील.
त्या पुढे म्हणाल्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेला आणि जातीव्यवस्थेला जबरदस्त हादरा दिला होता. महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार वाटचाल करणे फार आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची पायाभरणी केली असून त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार यासाठीच केला होता की बौद्ध हा धम्म विज्ञानवादी आहे.तर्काच्या कसोटीवर घासून चिकित्सा करा असे बुद्ध नेहमी सांगतो त्यामुळे महिलांनी जागरूकतेने कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बळी न पडता आपले जगणे संविधानातील तत्त्वानुसार स्वातंत्र्य समता बंधुता यांचा अंगिकार करून प्रज्ञा शिल करूणा या धम्म विचारांशी बांधील राहिले पाहिजे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कदम, भरणी सरपंच अश्विनी मेस्त्री, उपसरपंच दिलीप कदम, नंदन घोगळे, दर्पण प्रबोधिनी अध्यक्ष आनंद तांबे, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघ सचिव विनोद तांबे, धम्मउपासक सुशील कदम, कास्ट्राईब शिक्षक संघ महासचिव किशोर कदम, कवी सिद्धार्थ तांबे, सामाजिक कार्यकर्ते सुनील तांबे, दर्पण महिला फ्रंटच्या स्नेहल तांबे, कुडाळ तालुका बौद्ध विकास संघ शाखा कुडाळ सचिव संजय कदम, शिक्षक किशोर तांबे, संस्थेचे सचिव प्रथमेश कदम, प्रसिद्ध निवेदक राजेश कदम आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
माध्यमिक विद्यालय तळेबाजार मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा.नंदन घोगळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना घोगळे म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य समाजातील सर्व घटकांना प्रेरणादायक आहे. बहुुजनांच्या उद्धारासाठी त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याला जगात तोड नाही. त्यामुळे सर्व जगाने त्यांच्या विद्वत्तेचा आदर्श घेऊन आपला सर्वांगीण विकास करावा.
यावेळी भरणी सरपंच अश्विनी मेस्त्री तसेच ग्रामीण शाखेचे सल्लागार तथा उपसरपंच दिलीप कदम यांचा सामाजिक कार्यासाठी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना श्री.कदम म्हणाले की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि धम्मचळवळीत क्रांतीकारी विचार समाजातील तळागाळापर्यंत रुजविण्याची जबाबदारी आपली आहे.यासाठी सर्व संस्थांनी विशेषतः युवकांनी पुढाकार घेवून निस्वार्थी वृत्तीने कार्य करण्याची गरज आहे.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कदम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत छत्रपती शिवाजीमहाराज यांचा लोकाभिमुख राज्यकारभार,आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचे बहुजनांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याचे दाखले देत महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र मानवमुक्तीच्या लढ्यातील अनेक प्रसंग कथन करत सामाजिक चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी निरपेक्ष वृत्तीने स्वतःला झोकून द्यावे, यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राची आठवण ठेवावी असे आवाहन केले.
यावेळी धम्मउपासक सुशील कदम, आयडॉल ऑफ महाराष्ट्र, निवेदक राजेश कदम यांचाही सन्मान करण्यात आला. कवी सिद्धार्थ तांबे, आनंद तांबे, सुशील कदम, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जयंतीमहोत्सवाचे औचित्य साधून कुडाळ येथील गौरी बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये बहुसंख्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या पैठणीच्या खेळात रसिका राजेश कदम होम मिनिस्टर विजेत्या ठरल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी प्रदान करण्यात आली.तर उपविजेत्या ठरलेल्या कादंबरी सुरेश कदम आणि तन्वी तांबे यांचाही सन्मान करण्यात आला.
रात्री नितीन बांदेकर प्रस्तुत बुद्ध-भीमगीते, हिंदी मराठी गीतांचा आणि नृत्यांचा सदाबहार संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.यावेळी मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद फेम गायिका पृथ्वी विनोद तांबे हिचाही सन्मान करण्यात आला. तिने आपल्या पहाडी गायनाने रसिकांची मने जिंकली. नितीन बांदेकर यांचे संगीत संयोजन आणि गौरी बांदेकर यांच्या समयोचित निवेदनाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ज्यांनी आयोजनासाठी सहयोग दिला त्या सर्वांना शाल, पुष्पगुच्छ आणि वृक्षवाटीका देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष मंगेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन संदेश तांबे आणि आभार खजिनदार सुशांत कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या पूर्वी कोरोना काळानंतर निधन झालेल्या मंडळाच्या कालकथित सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भरणी बौद्ध विकास मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.














