कारवाई न केल्यास आंदोलनाचा खवणे ग्रामस्थानाचा इशारा
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आकाश फिशमील व फीशऑईल ही कंपनीच नाशिवंत पाणी खवणे खाडीपात्रामध्ये सोडीत असुन त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला आहे, त्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा खवणे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना आज दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन ५६९ ग्रामस्थांच्या सहीचे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे. केळूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात माळरानावर आकाश फिशमील व फीशऑईल कंपनी लि. केळुस ही खाजगी कंपनी स्थापीत असुन कंपनीमध्ये माशांवर प्रक्रीया केली जाते. प्रक्रीयेदरम्यान निर्माण झालेले नाशिवंत पाणी कंपनीने माळरानावर मोठ्या टाक्या खोदून तेथे साठवून ठेवले जाते. पावसाळ्यामध्ये सदर साठलेले पाणी मोठ्या पाईपद्वारे म्हापण ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खवणे खाडीपर्यंत येणाऱ्या ओहोळात सोडले जाते. २७ जुन २०२४ रोजी मोठ्या पावसाचा फायदा घेत कंपनीने सदरचे साठवून ठेवलेले नाशिवंत पाणी पाईपद्वारे खवणे खाडीपात्रामध्ये सोडले असुन त्यामुळे खाडीतील पाणी रसायनयुक्त, फेसाळलेले व अतीशय घाण झालेले आहे. या घाण झालेल्या पाण्यामुळे संपुर्ण खवणे परीसरात दुर्गंधी पसरलेली आहे. तसेच खाडीपात्रातील मासे या दुषीत पाण्यामुळे मेलेले असुन त्यामुळे पावसाळी हंगामात स्थानिक लोकांचे मासेमारीचे रोजीरोटीचे साधन नष्ट झाले आहे. तसेच हे पाणी खाडीनजीक असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरींमध्ये जावून त्यामुळे स्थानिक नागरीकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होणार आहे.
या सर्व प्रकारामूळे सर्व ग्रामस्थ हवालदील झालेले असुन सदर प्रकारे प्राणघातक, दुषीत पाणी सार्वजनिक खाडीमध्ये सोडणाऱ्या कंपनीवर तात्काळ कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसे न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. निवेदनावर अविनाश खोत, हेमंत परब, चंद्रकांत घाडी, विलास मोडकर, दत्ताराम साटम, श्रेया परब, छाया परब, स्वरा परब, सावित्री परब यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.












