सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथील बाजारपेठेत डोक्यात लाकडी फळीने मारहाण करून खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी समीर ज्ञानेश्वर पेडणेकर ( वय 36, रा, झरेबांबर, ता दोडामार्ग ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. या कामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. समीर पेडणेकर याने मूळ कोयना आणि सध्या साटेली भेडशी येथे वास्तव्यास असलेल्या अमर मनोहर देशमाने ( वय 50 ) याच्या डोक्यावर लाकडी फळीने मारले.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हा गुन्हा 21 मे 2024 रात्री साडे नऊ ते 22 मे 2024 सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडला होता. या गुन्ह्यात दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी तात्काळ संशयित आरोपी समीर पेडणेकर याला 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजता अटक केली होती. आरोपी समीर याने मयत देशमाने याने आपल्याला शिवीगाळ केली म्हणून लाकडी फळी डोक्यात मारल्याचे कबूल केले होते. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या समीर पेडणेकर याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेत पुढील मुद्दे न्यायालयासमोर मांडले. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे, आरोपी आणि फिर्यादी व साक्षीदार एकाच गावातील असल्याने जामीन मिळाल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, आरोपीचा खुनाच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष व मुख्य सहभाग आहे, आरोपीने सदर गुन्हा नियोजनबद्ध केला आहे, आरोपीविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करून तो न्यायालयात सादर करणे बाकी आहे. वरील मुद्दे लक्षात घेत जिल्हा न्यायाधीशांनी आरोपी समीर पेडणेकर चा जामीन अर्ज नामंजूर केला.