सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विरोधी पक्षाने सध्या महायुतीच्या विरोधात आंदोलनाचा स्टंट सुरू केला आहे. कोणतीही शासकीय योजना सुरू करताना त्यात त्रुटी राहतात. त्यात नंतर सुधारणा केली जाते. त्यानुसार काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे या योजनेत त्रुटी राहिल्या आहेत. त्यात सुधारणा करण्याची मागणी सिंधुदुर्ग भाजप किसन मोर्चाने केली आहे. त्यानुसार सुधारणा होणार असल्याचे लक्षात आल्याने आज विरोधी पक्षाने या विरोधात आंदोलनाचा स्टंट करीत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशी टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली.
ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे या योजनेत असंख्य त्रुटी आहेत. जिल्ह्यातील काजू उत्पादक यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे शासनाच्या आदेश फेडण्यासाठी आंदोलन केले. त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष सावंत यांनी पत्रकार परिषद घेत या आंदोलनावर स्टंटबाजी अशी टीका केली. यावेळी भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, सरचिटणीस महेश संसारे, फार्मा प्रोड्युसर जिल्हा संयोजक बापू पंडित, महादेव सावंत आदी उपस्थित होते.