आचरा (विवेक परब) : चिंदर गावचा बहुतांशी भाग हा ग्रामीण भागात येतो जिथे वाहतुकीची साधने कमी आहेत. यामुळे शाळेतील मुले, गरोदर माता, रुग्ण यांना 3 ते 4 किलोमीटर पाय पिट करावी लागते. गेल्या अनेक वर्षा पासून चिंदर पालकरवाडी, पाटणवाडी, साटमवाडी, लब्देवाडी मार्गे एस टी बस सेवा सुरु व्हावी ही लोकांची आग्रही मागणी आहे.
याचा पाठपुरावा करत ग्रामपंचायत उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्त अध्यक्ष संतोष गावकर यांनी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सिंधुदुर्गचे उपअभियंता यांचे सदरील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता एस टी वाहतूकीसाठी योग्य असल्याचे पत्र व ग्रामपंचायतचे एस. टी वाहतूक सुरु करण्या बाबतचे पत्र विभागीय वाहतूक नियंत्रक कार्यालय कणकवली यांना दिले.
काहीच दिवसात सदर मार्गाचे सर्वेक्षण केले जाणार असून सर्वे करताना मार्गात काही अडचण निर्माण झाल्यास तो ग्रामपंचायतीच्या वतीने तात्काळ दूर केला जाणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन उपसरपंच दिपक सुर्वे यांनी केले आहे. रात्री वस्तीची एस टी सुरु केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने वाहक व चालक यांची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती उपसरपंच दिपक सुर्वे यांनी दिली आहे.