ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
मे 2024 मधील चक्रीवादळग्रस्त अजून आहेत भरपाईच्या प्रतीक्षेत
अन्यथा नुकसानग्रस्त लोकांना घेऊन आंदोलन छेडणार !
कणकवली (प्रतिनिधी) : मे महिन्यामध्ये कणकवली तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे हरकुळ, हळवल सह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे दिलेले आश्वासन तीन महिने उलटल्यानंतर देखील हवेत विरले. या मतदारसंघाच्या आमदारांचे या बाबीकडे दुर्लक्ष झाले असून तुम्हाला जर गोरगरीब नागरिकांच्या झालेल्या नुकसानाची हक्काची भरपाई द्यायला जमत नसेल तर एकदाचे भरपाई देणार नाही हे जाहीर करून टाका. असा संतप्त भूमिका घेत कणकवली तालुक्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी चर्चा केली.
यावर प्रांताधिकारी कातकर यांनी या नुकसानीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला आहे. व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर गेल्याची माहिती दिली. प्रस्ताव गेला ही कारणे नकोत. गणेश चतुर्थी नंतर आचारसंहिता लागू झाल्यानंतर भरपाई देता येणार नाही अशी कारणे सांगून तुम्ही वेळ काढणार असा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. व त्यानंतर हे सरकार राहणार नाही महाविकास आघाडीचे सरकार येणार. जर भरपाई द्यायची नसेल तर अशा चक्रीवादळाची भरपाई शासन देणार नाही हे एकदा जाहीर करून टाका मग लोक मोकळे झाले असा खोचक टोला तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी लगावला. दरम्यान याबाबत पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात येईल अशी माहिती कातकर यांनी दिली. मात्र तुम्ही लोकांना नुकसान भरपाई केव्हा देणार ते सांगा अशी आग्रही भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली.
यावेळी शासन गोरगरिबांचे आहे या केवळ घोषणा येथील आमदार करतात. मात्र गोरगरीब लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यायला शासनाकडे पैसे नाहीत. केवळ दिखाव्यापूर्ती आश्वासने नकोत. तातडीने हालचाल करा व या सर्व लोकांना गणेश चतुर्थी पूर्वी नुकसान भरपाई मिळवून द्या. अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. असे न केल्यास कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर या सर्व लोकांना घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा नाईक यांनी दिला. शासनाकडे प्रस्ताव पाठवला हे तुमचे उत्तर योग्य नाही. हे तुमचं कामच आहे. भरपाई केव्हा मिळणार ते सांगा असा सवाल कन्हैया पारकर यांनी केला. जर प्रस्ताव पाठवला तर अजून भरपाई का मिळाली नाही. असा सवाल उत्तम लोके यांनी करताच प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी आमची आहे शासनाकडून निधी का आला नाही याचे कारण सांगता येणार नाही असे प्रांताधिकार्यानी सांगितले. या प्रकरणात खोटं बोलण्यापेक्षा पैसे मिळणार नाहीत असे स्पष्ट बोला असा टोला कन्हैया पारकर यांनी लगावला. तसेच त्यांनी यावेळी शासनाच्या या दिरंगाईचा निषेध देखील केला. मे महिन्यामध्ये चक्रीवादळाने नुकसान झाले. तीन महिने उलटले तरी या नुकसान भरपाईची रक्कम लोकांना मिळाली नाही. लोक आशेवर आहेत. प्रस्ताव पाठवून उपयोग काय. लोकांना भरपाई कधी मिळणार असा सवाल यावेळी करण्यात आला.
स्थानिक आमदारांनी नुकसानीच्या वेळी पाहणी दरम्यान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. प्रशासन म्हणून तुम्ही देखील पंचनामे केल्यावर भरपाई मिळेल असे लोकांना सांगितलं मग भरपाई का मिळाली नाही असा प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर तहसीलदार देशपांडे यांनी आम्ही पंचनामे तात्काळ केले व प्रस्ताव पाठवले. भरपाई मिळणार असा शब्द आम्ही सांगितला नाही. किंवा बाईट दिली नाही असे स्पष्ट केले. मात्र ठाकरे गटाने यावेळी आक्रमक भूमिका घेत गणपतीपूर्वी लोकांच्या खात्यावर पैसे जमा होणार की नाही ते सांगा. अन्यथा तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा दिला. अखेर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा पत्रव्यवहार करण्यात येईल अशी ग्वाही प्रांताधिकारी जगदीश कातकर व तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. याप्रसंगी युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपशहर प्रमुख वैभव मालडकर, महेश कोदे, अजित काणेकर, राजु राठोड, पराग म्हापसेकर, रवी सावंत आदी उपस्थित