जि.प.शाळेतील विद्यार्थिनींनी आजी आजोबांना बांधली राखी

दिविजा वृद्धाश्रमात शालेय विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसोबत साजरा केला रक्षाबंधन कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : रक्षाबंधनाचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी, जि.प.प्राथमिक शाळा कोळोशी-हडपिड, जि.प.प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी, माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिड यातील शालेय विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात येऊन आजी आजोबांसोबत अगदी आनंदाने व उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. विद्यार्थ्यांनी राखी बांधल्यावर दिविजा वृद्धाश्रम मार्फत कॅटबरी देण्यात आल्या. आजी-आजोबा आपल्या नातवंडांचे प्रेम पाहून भावनिक होऊन गेले होते काही आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू टिपकताना दिसत होते. काही आजी आजोबा कित्येक वर्षानंतर पुन्हा नातवंडानी राखी बांधली याचा आनंद व्यक्त करत होते. विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसाठी नाच, गाणी व पोवाडे सादर करून आजी आजोबांना तीन तास मंत्रमुग्ध केले होते आजी आजोबाही आपले आजारपण विसरून त्यांच्या सोबत आनंदात सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी आश्रमचे कर्मचारी समीर मिठबावकर व सखाराम कोकरे यांनी फनी गेम्स चे आयोजन केले होते. गेम्स मध्ये नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन दिविजा वृद्धाश्रमाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

शालेय शिक्षक अश्विनी गर्जे, पवार, बबीता मुंढे, स्मित गुरव, जयेंद्र चव्हाण यांनी नारळ फोडण्याचा खेळामध्ये उत्साहाने भाग घेतला. आश्रमातील आजोबा वामन जोशी, सतेज रणखांबे यांनीही नारळ फोडीचा खेळ खेळून नारळी पौर्णिमेची परंपरा जपली. आजी आजोबांनी विद्यार्थ्यांसोबत पंचपक वान्नचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने विद्यार्थी व आश्रमातील आजी आजोबांनी दिविजा वृद्धाश्रमात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाचे नियोजन कु अश्विनी पटकारे यांनी केले होते. आजी आजोबांना पारंपारिक कपडे नेसवण्याचे काम सायली तांबे, अस्मि राणे व अर्चना इंदप यांनी केले. आश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशा प्रकारे दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अविस्मरणीय रक्षाबंधन करण्याचा विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांनी घेतलेला सहभाग खरच लाखमोलाचा ठरणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामाजिक बंधिलकेचा धडा वृद्धाश्रमात येऊन दाखविला आहे. शिक्षकांच्या सहकार्यामुळे आजी आजोबांच्या जीवनात एक दिवसाचा नातवंडांचा सुखवास मिळाल्यामुळे आजी आजोबांनी शिक्षकांनाही भरभरून आशीर्वाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!