बडोदा व पनवेल मधून हरवल्याने निराधार झालेल्या दोन आजी आजोबांना पावले गुगल बाप्पा
समर्थ आश्रम च्या टिमने गुगल सर्च आधारे घडवून आणले अवघ्या एका दिवसात वयोवृध्द निराधार बांधवांचे कुटुंब पुनर्मिलन
खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रम कार्यकर्त्यांनी बडोदा येथून हरवलेले मावजीभाई वाघरी व पनवेल येथून हरवलेली आदिवासी महिला पदी गोमा भुकरे या दोन्ही वय वर्षेः ७० असलेल्या वयोवृध्द आणि शारिरीक व मानसिकदृष्ट्या आजारी आजी आजोबांचे दि.१५ सप्टेंबर,२०२४ रोजी गुगल सर्च आधारे एका दिवसात कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले आहे.
जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी ११ वर्षांपुर्वी हाती कोणतीही संसाधने नसताना सांताक्रुजच्या वाकोला पुलाखालून रस्त्यावरील जख्मी आजारी, मनोरूग्ण, निराधार बांधवांच्या सेवा सुश्रुषेचे कार्य सुरू केले. या कार्याला मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याने पुढे संस्थेचे मुंबई, पालघर, सिंधुदुर्गसह गोव्यात आश्रम व शेल्टर होम उभे राहिले. आज या आश्रमांद्वारे कुटुंबापासून हरवलेल्या, दुरावलेल्या देशभरातील अनेक वयोवृध्द आजी-आजोबा , निराधार मनोरूग्णांचे पुनर्वसनासाठी व त्यांचे कुटुंबात पुन्हा पुनर्मिलन करण्यासाठी कार्य केले जात आहे.
पदी गोमा भुकरे रा.देहरंग ता.पनवेल ही आजी गावातल्या महिलांसह पनवेलच्या बाजारात रानभाज्या आणि दुर्वा विकायला आली आणि १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी घरी जात असताना चुकीने पनवेल एसटी स्टँण्डवर दादर /मुंबईकडच्या गाडीत बसून मुंबईकडे आली असावी. मुंबईत आजीचा अपघात होवून पायाला इजा झाली. बिकेसी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी तीला रूग्णालयात दाखल करून उपचार केले.व निराधार आजीला आश्रयासाठी १४ सप्टेंबरच्या रात्री विरारच्या समर्थ आश्रमात दाखल केले. वयोवृध्द पदी आजीचे उच्चार व आदिवासी ठाकर भाषेतील बोलणे कुणालाच समजत नव्हते.
बडोदा जवळील अकोटा येथे राहणारे मावजीभाई वाघरी हे पँरँलिसिस झालेले गृहस्थ मनोरूग्णावस्थेत गाडीत बसून थेट नालासोपारा येथे पोहचले. त्यांना तुळींज पोलीसांनी १४ सप्टेंबरच्या सकाळी पहाटे ३-०० वाजता समर्थ आश्रमात दाखल केले. मावजी वाघरी यांची बडोद्यातील अकोटा पोलीस स्टेशनला तर पदी भुकरे यांची पनवेल पोलीस स्टेशनला कुटुंबियांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती.
जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे व आश्रमच्या टिमने वयोवृध्दता व आजारपणामुळे स्पष्ट उच्चार करू न शकणा-या बांधवांशी अनेकतास व अथकपणे हळुवार संवाद साधला. व गुगल सर्च तंत्राद्वारे दोन्ही निराधार बांधवांची गावे व कुटुंबांचा यशस्वी शोध घेतला. या शोध कार्यात बडोदा येथील नवापुरा पोलीस स्टेशन व अकोटा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पनवेलमधील मालडुंगे ग्रामपंचायतचे माजी ग्रामसेवक धनंजय निकम यांचेसह पोलीस पाटील नारायण चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले. शोध प्रवासात श्रमजीवी संघटना महाराष्ट्रच्या कार्यकर्त्यांचेही सहकार्य लाभले.
आता दोन्ही बांधव कुटुंबियांसह सुखरूप घरी पोहचले आहेत.समर्थ आश्रमचे भाईदास माळी, दिपाली मेघा-माळी, चंदा छेत्री, हेमलता पवार, दिपक अडसुळे यांची टिम व आश्रमातील भगीणींनी औक्षण करून हरवलेल्या आजी आजोबांना सुखमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.