अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 3 होड्या नदीत बुडवल्या ; ग्रामस्थांनी पकडल्या होड्या

काळसे बागवाडी येथे महसूल पोलीस आणि बंदर विभागाची संयुक्त कारवाई

चौके (प्रतिनिधी) : काळसे बागवाडी येथील कर्ली नदिपात्रातील हायकोर्टाने वाळू उत्खननासाठी प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रात अनधिकृतपणे वाळू उत्खनन करीत असलेल्या तीन होड्या सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्थानिक ग्रामस्थांनी पकडून बागवाडी कर्ली खाडीकिनारी आणून महसूल विभागाच्या ताब्यात दिल्या. या वेळी होड्यांवरील भैय्या कामगारांनी मात्र पलायन केले. या तिन्ही होड्यामध्ये प्रत्येकी ९ ब्रास याप्रमाणे २७ ब्रास वाळू आढळून आली. त्यानंतर महसुल विभाग, पोलीस प्रशासन आणि बंदर विभाग यांनी सदर होड्यांवर संयुक्त कारवाई करत वाळूने भरलेल्या तीनही होड्या कर्ली नदिपात्रात बुडवून कडक कारवाई केली. ही कारवाई सोमवारी रात्री ८:४५ ते १० या कालावधीत करण्यात आली. या कारवाईमुळे परीसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाई प्रसंगी मंडळ अधिकारी दिपक शिंग्रे, काळसे तलाठी निलम सावंत, धामापूर तलाठी एस. के. थोरात, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंते, पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर, पांचाळ, पाटील, मुल्ला, पोलीस पाटील विनायक प्रभु , सहाय्यक बंदर निरीक्षक परदेसी, यांच्या सह कोतवाल आणि होड्या पकडून देणारे रीट पिटीशनर धारक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी अनधिकृत होड्या पकडून देणाऱ्या ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत कर्ली नदिपात्रात दिवसरात्र अनधिकृतपणे उत्खनन करणाऱ्या होड्या आतापर्यंत तीन ते चार वेळा वाळू माफियांचा धोका पत्करून ग्रामस्थांनीच पकडून दिल्या आहेत. मग महसूल विभाग थेट अशी कारवाई का करू शकत नाही ? असा सवाल यावेळी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!