चौके (प्रतिनिधी) : कसाल महामार्गावर चौके नजिकच्या माळरानावर काल रात्री अज्ञातांनी केलेल्या मारहाणीत दीपक वामन येंडे वय-५६ सध्या रा. कट्टा मूळ रा. बोर्डवे-कणकवली या प्राैढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : दीपक येंडे यांचे कट्टा बाजारपेठ येथे दुकान आहे. बहिणीच्या छेडछाडीच्या विषयावरून संशयितांनी काल रात्री त्यांना चौके येथील माळरानावर कोणत्यातरी हत्याराने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात त्यांना कणकवली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौके येथील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव अधिक तपास करत आहेत.