कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून 4 जून रोजी राजेंद्रनगर कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे. कदंब महोत्सव समिती कोल्हापूर ने या पुरस्काराची घोषणा केली. मानवमुक्ती दिनी 25 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झालेल्या सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक जडणघडणींवर भाष्य करणारे संयत विद्रोही काव्य म्हणून राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाने मराठी साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील डॉ.कमलताई हर्डीकर, निलांबरी कुलकर्णी, गौरी भोगले, मंजुश्री गोखले, डॉ. प्रमिला जरग यांच्या संकल्पनेतून 5 जून 2013 रोजी कदंब महोत्सवाला सुरुवात झाली. एका वृक्षाच्या नावाने दिला जाणारा देशातील हा एकमेव साहित्य पुरस्कार आहे. जेष्ठ साहित्यीक विजयकुमार नलगे यांच्या हस्ते 2013 साली पहिल्या कदंब महोत्सवात साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. यावर्षी दशकपूर्ती कदंब महोत्सव साजरा केला जाणार असून त्यावेळी साहित्य पुरस्कार वितरण केले जाणार आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी..प्रमाणे केवळ झाडांवर प्रेम करा असे नव्हे तर त्यांचा आदर राखा हा संदेश कदंब पुरस्काराच्या निमित्ताने दिला जातो. या पुरस्काराबद्दल कवयित्री सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.