तळेरे (प्रतिनिधी) : राणी पार्वतीदेवी हायस्कूल व जूनि.कॉलेज सावंतवाडी या प्रशालेतील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तसेच कवी, साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्यावतीने सेवानिवृत्तीपर सपत्नीक सत्कार करण्यात आला. गेली 33 वर्षे त्यांनी इंग्रजी विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले आहे.प्रवीण बांदेकर यांनी अध्यापना सोबतच एक उत्तम कवी ,लेखक, कादंबरीकार या रूपाने एक साहित्यिक म्हणून नावलौकिक प्राप्त केले आहे. प्राध्यापक ते साहित्यिक या त्यांच्या प्रवासादरम्यान ‘नवाक्षर दर्शन’ या नियतकालिकाचे संस्थापक तर ‘वैनतेय’ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. ‘सिंधुदुर्ग साहित्य संघ’ या साहित्यिक व्यासपीठावर आपल्या पहिल्या कवितेचे वाचन करीत बालसाहित्य लेखनाबरोबरच अनेक कविता, ललित लेख यांचे लेखन करीत ,चाळेगत, ‘उजव्या सोंडेचे बाहुल्या’ यासारख्या मराठी वाचकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कादंबरींचे लेखन करीत साहित्य व समाज यामध्ये त्यांनी एकत्व घडवून आणले.
या त्यांच्या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, गंगाधर गाडगीळ पुरस्कार, भैरू रतन दमाणी पुरस्कार यासारखे असंख्य पुरस्कार तसेच ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केला. शिक्षक भारती ,सिंधुदुर्ग या शासनमान्य संघटनेच्यावतीने त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रविण बांदेकर सरांचे शैक्षणिक व साहित्यिक कार्य हे अभिमानास्पद : संजय वेतुरेकर
सत्कार सोहळ्यात शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी केलेले शैक्षणिक व साहित्यिक कार्य हे अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या .
मनाला व बुद्धीला जे पटले तेच लेखणीच्या माध्यमातून सत्यात उतरविले – प्रविण बांदेकर
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती प्रविण बांदेकर सर यांनी आपण इतरांपेक्षा वेगळे नसून एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत तसेच आपल्या मनाला व बुद्धीला जे पटले ते मी लेखणीच्या माध्यमातून सत्यात उतरवण्याचा नेहमी प्रयत्न केला व पुढेही करत राहील असे विचार व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, जिल्हा सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, संघटनेचे माजी सचिव सुरेश चौकेकर, दीपक तारी, माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालिका सुमेधा नाईक, महिला आघाडी सचिव प्रगती आडेलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्षा शारदा गावडे, महेश पास्ते, विजय ठाकर, रमेश गावडे, विद्यानंद पिळणकर, माणिक पवार, अनिकेत वेतुरेकर, माधव लोखंडे, चंदन गोसावी आनंदी मोयेॅ ,दशरथ सांगळे ,सुनील जाधव, राजाराम पवार यांच्यासह सौ.बांदेकर आणि संघटनेचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.