केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर प्रचार सभा
कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपाचे देशभरातील स्टार प्रचारक रत्नागिरी सिंधुदुर्गात जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ राजापुरात राजीव गांधी मैदानात 26 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता धडाडणार आहे. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 1 मे रोजी कुडाळ मध्ये जाहीर सभा होणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही सभा रत्नागिरीत होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलू सावंत आदी उपस्थित होते. जठार पुढे म्हणाले की केंद्रीयमंत्री राणे यांच्या उमेदवारी मुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महत्व दिल्ली दरबारी वाढले आहे. खुद्द केंद्रीय उद्योगमंत्री राणे निवडणूक लढवत असल्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. राणेंना मोठ्या मताधिकक्याने महायुती करणार आहे. सिंधुदुर्गातून 4 लाख तर रत्नागिरीत साडेतीन लाख मते महायुती चे उमेदवार नारायण राणेंना मिळवून देणारा आहोत. विनायक राऊत हे नॉन परफॉरमिंग अकाउंट असून रत्नागिरी सिंधुदुर्ग चा विकासाला खो घालणारे राऊत यांचे हे खाते आता बंद करण्याची वेळ आली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी जे जगभरात परफॉर्मन्स गुरू म्हणून परिचित आहेत तर दुसरीकडे विनायक राऊत हे शून्य परफॉर्मन्स खासदार आहेत.केंद्राने दिलेल्या योजनाही विनायक राऊत या मतदारसंघात राबवू शकले नाहीत. पाणी रस्ते प्रश्नही विनायक राऊत सोडवू शकले नाहीत. 2 लाख युवकांना रोजगार देणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्पही राऊत यांनी रखंडवला. रोजगार न देणाऱ्या विनायक राऊत ना युवाशक्तीच घरी बसवणार आहेत. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या विनायक राऊत यांनी पुढील 10 वर्षांच्या सिंधुदुर्ग विकासाची ब्ल्यू प्रिंट तरी दाखवा असे आवाहनच जठार यांनी दिले. विकास प्रकल्पाला विरोध करणाऱ्या विनायक राऊत यांनी कोणता विकास प्रकल्प आणणार ते सांगावे. खांबाटा सारखा प्रकल्प राऊत यांनी बंद पडून हजारो मराठी तरुणांना बेरोजगार केल्याची टीकाही जठार यांनी केली.