ओरोस (प्रतिनिधी) : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती बंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ मार्च 2013 रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच या मागणीसाठी 27 फेब्रुवारी पासून मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याबाबतचे निवेदन आज जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले.
तसेच ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा समन्वयक परेश परब यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास मिठबावकर यांच्यासह मोतीराम वळंजु, संतोष ठूकरुल, जनार्दन लोरेकर, तुषार शिंगरे, तुषार हडशी, रुपेश कांबळे, राजेश सावंत, शंकर सावंत, प्रशांत वारस्कर, रुपेश सांगवेकर, नंदकिशोर प्रभूदेसाई, पूजा अपराज, अश्विनी ओटवकर, पूर्वा तांबे, सुहास चव्हाण, जयेश तावडे, अन्वी तांबे, समीर परब, भालचंद्र माकजकर आदी उपस्थित होते.