खारेपाटण येथे पोलीस पथकाचे संचलन
खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा असलेल्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील खारेपाटण या गावी आज सोमवारी सकाळी ११.३० वाजता कणकवली पी एस आय शरद देठे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कायदा व्यवस्था सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या पथकाच्या वतीने संचलन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे प्रमुख पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते व अन्य पोलीस कर्मचारी या संचलनात सहभागी होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथे पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या संचलनात कणकवली पोलीस ठाणे अंमलदार ग्रुप व राज्य राखीव पोलिस दलाची गोंदिया पुणे येथील शीघ्र दलाची तुकडी असे मिळून एकूण ९० पोलीस कर्मचारी आपल्याजवळील सुरक्षा शस्त्रासह ५ मोठ्या वाहानां सोबत उपस्थित होते. खारेपाटण एस टी बसस्थानक येथे पोलीस पथकांचे सामुदायिक संचलन झाल्यानंतर खारेपाटण एस टी बसस्थानक ते खारेपाटण बाजारपेठ मार्गे घोडेपाथर बंदर, खारेपाटण अशी प्रभात फेरी काढत पोलिसांनी संपूर्ण खारेपाटण मध्ये संचलन केले.