उद्धव ठाकरे यांची 3 मे रोजी कणकवलीत प्रचारसभा

राणेंचा तिसऱ्यांदा पराभव निश्चित ; राऊतांना सिंधुदुर्गात 1 लाखाचे मताधिक्क्य देणार

राणेंचा पराभव करून विनायक राऊत करणार हॅट्ट्रिक

कणकवली (प्रतिनिधी) : शुक्रवार 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात होणार आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे.या सभेला कणकवली विधानसभा आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील 5 तालुक्यातील इंडिया आघाडी मित्रपक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील 2200 गावे 23 हजार वाड्यांतील प्रत्येक घरात विनायक राऊत यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. मागील 10 वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लाख पेक्ष्या अधिक मताधिक्याने राऊत विजयी होणार आहेत. विरोधी उमेदवार नारायण राणे यांचा याआधी दोन वेळा पराभव शिवसेनेने केला आहे. कुडाळ मालवण मतदारसंघात पहिल्यांदा आमदार वैभव नाईक यांनी आणि नंतर बांद्रा पोटनिवडणूकीत तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला. राणेंचा जनाधार आता संपला आहे. त्यामुळेच राणेंचा तिसऱ्यांदा पराभव करून विनायक राऊत हे विजयाची हॅट्ट्रिक करतील.राणेशाही आता संपली असून सामंत शाही अस्तित्वात येईल म्हणून राणेंनी किरण सामंत यांच्या उमेदवारीला विरोध करून स्वतःसाठी उमेदवारी मिळवली.कोकण ही परशुरामाची भूमी असून अति तिथे माती करणारी ही भूमी आहे. मोदींच्या करभाराविरुद्ध जनतेत प्रचंड रोष आहे. 7 मे रोजी निवडणूक निकालात हा रोष दिसून येईल. विनायक राऊत यांच्या खळा बैठक, जाहीर सभाना मतदारसंघात जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.मोदींच्या काळात बेरोजगारी वाढली असून महागाईने जनता त्रासली आहे. जनतेत भाजपा आणि मोदींविरोधात संतापाची लाट आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी झुकते माप दिले.शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून त्यासाठी अब्जावधी निधी दिला.चिपी विमानतळ पूर्ण केले. जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असून विनायक राऊत याना मतदान करून जनता विरोधकांना चितपट करेल. उद्धव ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे असे पारकर यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!