ऍड. उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : सामाईक मिळकतीच्या वादातून आठ लोकांच्या बेकायदेशिर जमावाने महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याच्या आरोपातून लक्ष्मण विष्णू आंगणे व सात जणांची येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी टि. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
१४ फेब्रुवारी २०१८ रोजी फिर्यादीचे वडिल है आरोपी लक्ष्मण आंगणे, भरत आंगणे, सचिन आंगणे, संजना आंगणे, शत्रुघ्न आंगणे, वनिता आंगणे, भारती आंगणे व विष्णू आंगणे यांना एकत्र कुटुंबांच्या जमिनीत त्यांची परवानगी न घेता घराचे बांधकाम का सुरू केले असे विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना बेकायदेशीर जमाव करून बेदम मारहाण केली होती. याबाबत फिर्यादीला कळताच ती दुसऱ्या दिवशी गावी आली व तीने १५ फेब्रुवारी रोजी आरोपींना त्यांच्या कृत्याबाबत जाब विचारला. त्यावरून रागाने आरोपींनी तीला अश्लिल शिवीगाळ करून बेकायदा जमावाने जबर मारहाण केली. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर भादंवि कलम ३५४, ५०९, ३२३, ३४३, १४७, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीत विश्वासार्ह पुरावा न आल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.