“विद्यार्थ्यांनी पुस्तकांना आपले मित्र बनवले पाहिजे….” अध्यक्षा मंगला राणे
खारेपाटण (प्रतिनिधी) : “शालेय विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर वाचन करून आपल्या आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत पुस्तकांना आपले मित्र बनविले पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार नगर वाचनालय खारेपाटण या संस्थेच्या अध्यक्षा मंगला राणे यांनी नगर वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना काढले.
जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या सभागृहात मंगला राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला नगर वाचनालय खारेपाटण या संस्थेच्या कार्यवाह मनीषा मालांडकर, संचालक विजय देसाई, संतोष पाटणकर, राजेश वारंगे, खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर, वाचनालयाचे ग्रंथपाल महेश सकपाळ लिपिक रिया जाधव, कर्मचारी बाबू लाड आदी मान्यवर पदाधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने नुकत्याच शालेय विद्यार्थ्यांना करीता दोन गटात कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक गटात कु.सांची संतोष पाटणकर तर माध्यमिक गटात रेवण अनंत राऊळ या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. या बरोबरच दोन्ही गटातील अनुक्रमे गुणवंत विद्यार्थ्यांचा नगर वाचनालय खारेपाटणच्या वतीने. रोख रकमेचे पारितोषिक, भेटवस्तू, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कथाकथन स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी नगर वाचनालय खारेपाटणच्या वतीने संस्थेच्या कार्यवाहमनीषा मलांडकर व खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांचा नगर वाचनालयाच्या अध्यक्षा मंगला राणे व संचालक विजय देसाई यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक राजेश वारंगे, मनीषा मालांडकर, विजय देसाई, संतोष पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले. तर प्रास्तविक संचालक संतोष पाटणकर यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार नगर वाचनालयाचे ग्रंथपाल महेश सकपाळ यांनी मानले.