गोव्यातील म्हापसा येथून पाच निराधार बांधव संविता आश्रमात दाखल
दारिद्र्य, नैराश्य आणि व्यसनाधिनतेने गांजलेल्या निराधार बांधवांना संविता आश्रमचा दिलासा
खारेपाटण (प्रतिनिधी) : गोव्यातील म्हापसा टँक्सी स्टँण्ड जवळून रस्त्यावरचे निराधार जीवन जगत आसलेल्या पाच बांधवांना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी नुकतेच संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल केले.
देशातील वेगवेगळ्या पाच राज्यांत मुळगाव असलेले हे बांधव जीवनातील दारिद्र्य, निराशा आणि व्यसनाधिनते मुळे गोव्यातील रस्त्यावर निराधार वंचिततेचे जीवन जगत होते. म्हापसा तील या बांधवांचा विश्वास संपादन करून त्यांना आश्रमात आणता यावे म्हणून संदिप परब हे दि.१६ जुनच्या रात्री म्हापसा टँक्सी स्टँण्ड जवळील फुटपाथवरच झोपले होते.
रस्त्यावर निराधार व वंचित जीवन कोणालाही जगावे लागू नये.या जगात ज्यांचे कोणी नाही, त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत, या भूमिकेतून संस्थेचे कार्य आव्याहत सुरू आहे. म्हापसा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून १) चंदन चासा रा.मनियारखाल (आसाम) २) नारायण शिंदे रा.आल्लोळे ता हाल्याळ जि.कारवार (कर्नाटक) ३) सुनिल मणी रा. भोमा जि.शिवनी (मध्यप्रदेश) , ४) देवा चव्हाण रा.बेगमपूर जि.सोलापूर (महाराष्ट्र) ५) मनिकंदन रा.कोईम्बतूर (तामिळनाडू) या बांधवांना संविताआश्रमात नुकतेच दाखल करण्यात आले आहे. संविता आश्रमात दाखल करण्यापूर्वी या बांधवांसाठी संस्थेच्या पर्रा येथील संवेदना आश्रमात चहा नाश्ता व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती.
जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी गोवा येथील दोन आश्रमांसह महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पालघर व सिंधुदुर्गमधील आश्रम, शेल्टर होम व डे केअर सेंटर्सद्वारे कार्यरत आहे.
गोवा राज्यात म्हापसा शहरातील सर्व निराधारांचे योग्य ते पुनर्वसन करून हे शहर रस्त्यावरील निराधार मुक्त असलेले शहर करण्याचा संकल्प करून संदिप परब यांनी चार वर्षांपूर्वी गोव्यात संस्थेचे कार्य सुरू केले. त्यानुसार आजतागायत ७२ व्यक्तींचे आश्रमच्या माध्यमातून पुनर्वसन केले आहे.
















