सार्व. बांधकाम खात्याच्या “नैसर्गिक आपत्ती” च्या कारणामागे वर्षभरातील ठेकेदारांच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश !
फोंडाघाट बाजारपेठेतील सीसीटीव्ही तातडीने सुरू करा ! मागणी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेले पाच दिवस फोंडाघाट मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात आहेत. त्यामुळे वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. यामध्ये एसटी बस वाहतूक अंतर्भूत केल्याने दाजीपूर- हसने – कारिवडे पासुन राधानगरी पर्यंतच्या मधील गावातील रुग्ण, बाजारहाट ग्रामस्थांना, फटका बसला आहे. मात्र गेले तीन दिवसापूर्वी पर्यंत व्होल्व्हो खाजगी वाहने वाहतूक होत होती. याबद्दल फोंडाघाट आणि घाटमाथ्यावरील नागरिक अबाल वृद्धांमध्ये संताप व्यक्त होत आहे. घाटमाथ्यावरील व्यापारी, हॉटेल धारक, रुग्ण, रहिवाशी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना फोंडाघाट गावाशी. जास्त संपर्क असतो. त्यासाठी गोरगरिबांना एसटी शिवाय पर्याय नाही. त्यामुळे घाट मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करावी अशी आग्रही मागणी होत आहे. सोमवार पर्यंत वाहतूक कायम सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दाजीपूर, राधानगरी, फोंडाघाट मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत उपकार्यकारी अभियंता, डेपो मॅनेजर, आपत्ती व्यवस्थापन यांचेकडे चौकशी करता, ही “नैसर्गिक आपत्ती” असल्याने अपघात – हानी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नैसर्गिक आपत्तीचे कारण सांगून सार्व. बांधकाम खाते आणि एसटी महामंडळाने अनेक अनुत्तरीत प्रश्न निर्माण केले आहेत.
यावरून कोट्यावधी रुपयांची निकृष्ट कामे होत असल्याने संरक्षक भिंती कोसळणे, रस्त्यामध्ये मोठ मोठाले खड्डे पडणे, साईड पट्टी खचल्याने अपघातास निमंत्रण,भर रस्त्यातील पाईप चक्क सरकल्याने खड्डा पडणे, आणि त्यामुळे वाहतूक वळविणे ह्या जर नैसर्गिक आपत्ती असतील तर, दरड कोसळणे ही कुठली आपत्ती ? असा संताप जनक सवाल विचारला जात आहे. केवळ टक्केवारीतून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार आणि सदैव सुरक्षित असलेला घाट मार्ग असुरक्षित करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हेतूपुरस्सर होत असल्याचा आरोप होत आहे.
अवजड वाहतुकीसाठी मार्ग वळविण्यात आला, हे जर खरे असेल तर, आयटीआय पर्यंत सकाळपासून लांबच लांब उभी असलेली वाहने रात्री बारानंतर पहाटेच्या अंधारात कोणत्या मार्गाने गायब होतात ? हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात चेक पोस्ट आणि फोंडाघाट बाजारातील कंट्रोल पॉईंटचे सीसीटीव्ही बंद अवस्थेत असले तरी, बाजारपेठेतील इतरांचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही अवजड वाहने कोणत्या मार्गाने गेली पाच दिवस जातात ? हे स्पष्ट होईल. याची तातडीने दखल घेऊन घाट मार्ग कायमस्वरूपी तातडीने सुरक्षित करावा. अशी आग्रही मागणी होत आहे. या दरम्यान खड्डा पडलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूचे पाईप बदलून त्यावर काँक्रिटीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पूर्ण होण्याच्या अवस्थेत आहे. लवकरच वाहतूक सुरू होईल ,अशी अपेक्षा बांधकाम खात्याकडून व्यक्त होत आहे.












