जनता दरबारात पालकमंत्री चव्हाण यांचे माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी वेधले लक्ष
कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय विभागाकडून चालू आर्थिक वर्षात 13 हजार 539 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय स्मशानभूमींचा विकास करावा. स्थानिक ग्रामपातळीवरील अनास्थेमुळे मागासवर्गीय स्मशानभूमींचा विकास होऊ शकला नसून याकडे गांभीर्याने लक्ष घालून सिंधुदुर्गातील मागासवर्गीय स्मशानभूमींचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लेखी निवेदनातून कणकवली नगरपंचायत चे माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जनता दरबारात केली. माजी नगरसेवक खुडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय स्मशानभूमीच्या प्रलंबित प्रश्नाकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.ग्रामपंचायत दफ्तरी मागासवर्गीय स्मशानभूमी नोंद असणे अत्यावश्यक आहे. मात्र अद्याप तशी नोंद झालेली नाही. काही गावांत अजूनही स्मशानशेड नसल्याने मृतदेहाचे दहन हे उघड्यावर करावे लागते. मागासवर्गीय स्मशानभूमी बऱ्यांच गावांत वस्तीपासून 3 ते 4 किमी लांब आहे.स्मशानभूमीपर्यंत जायला धड रस्ताही नाही. या सर्व प्रश्नांचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी माजी नगरसेवक खुडकर यांनी केली आहे.