महाविद्यालयातील व वैभववाडी परिसरातील उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केले
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी व वैभववाडी परिसरातील विद्यार्थी यांच्यासाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू होत आहे. येत्या डिसेंबर २०२४ मध्ये राज्य शासनाकडून ७००० पदांची मोठी पोलीस भरती अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग व एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे. हे प्रशिक्षण १२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार असून तीन महिने चालणार आहे. यामध्ये लेखी परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने तयारी करून घेतली जाईल. करियर कट्टा च्या ॲप वरती दररोज दीड ते दोन तास लेखी परीक्षेच्या तासिका होतील व पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारा सर्व अभ्यासक्रम तीन महिन्यांमध्ये पूर्ण करून घेतला जाईल. दर पंधरा दिवसातून एक सराव चाचणी महाविद्यालयामध्ये आयोजित केली जाईल. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची तयारी करून घेतली जाईल. ही चाचणी ऑफलाईन पद्धतीने घेतली जाईल. तसेच ऑनलाईन पद्धतीने सर्व जुने पेपर विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जातील. शारीरिक चाचणी साठी गोळा फेक व रनिंगची तयारी महाविद्यालयाच्या मैदानावर करून घेतली जाईल. इच्छुक उमेदवारांनी आपली नावे व प्रवेश अर्ज एनसीसी विभाग प्रमुख प्रा.आर. पी. काशेट्टी (९७३०४६०८५३) व करिअर कट्टा समन्वयक डॉ. अजित दिघे (८०८७५५५४६५) यांच्याकडे द्यावीत. या प्रशिक्षणाचा महाविद्यालयातील व वैभववाडी परिसरातील पोलीस भरती साठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केले आहे.