शिवडाव, नरडवे व तरंदळे धरणातील पाण्याचा विसर्ग करा..

अखिल भारतीय मराठा सेवा संघाची कणकवली तहसीलदारांकडे मागणी

दोन दिवसांत नदीपात्रात पाणी साेडण्याचे आश्वासन

कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली शहरासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याच्या पातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नद्यांचे पात्र कोरडी पडली आहेत.त्यामुळे नळ योजनाना पाणी पुरवठा खंडित होण्याची वेळ आलेली आहे. तसेच नागरिकांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.त्यामुळे प्रशासनाने तातडीने शिवडाव, नरडवे व तरंदळे धरणांमधील पाणीसाठ्याचा विसर्ग नद्यांमार्फत करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी कणकवली नायब तसीलदार शिवाजी राठोड यांच्याकडे अखिल भारतीय मराठा सेवा संघ, सिंधुदुर्ग यांनी केली आहे.यावेळी दोन दिवसांत नदीपात्रात पाणी सोडले जाईल,असे आश्वासन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मे महिन्यातील कडक उन्हाळ्याचा विचार करता सध्याच्या उन्हाच्या उष्णतेमुळे कणकवली शहरातील व आजूबाजूच्या गावातील विहिरीमधील पाण्याचा साठा कमी झाला आहे व नदीपात्र कोरडी पडलेली आहेत. यापूर्वी उन्हाळ्यामध्ये बंधाऱ्याला प्लेट घालून पाणी अडवले जात होते. यावर्षी तसे न केल्यामुळे पावसाचा पाण्याचा निचरा पूर्ण झाला आहे आणि त्यामुळे कणकवली शहर व आजूबाजूच्या गावातील विहिरीमधील पाण्याची पातळी खालावल्यामुळे लोकांची पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे. शिवडाव, नरडवे व तरंदळे धरणातील पाणीसाठा लोकांसाठी खुला करण्यात यावा. जेणेकरून नदीपात्रातील बंधाऱ्यामध्ये पाणी साठून राहील आणि कणकवली शहरातील व आजूबाजूच्या गावातील विहिरीमधील पाण्याची पातळी आपोआप वाढेल आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल व पाणी टंचाई दूर होईल. तरी प्रशासनाने तातडीने जनतेचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा ,अशी मागणी केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत,सचिव श्री. एस. एल.सपकाळ,उपाध्यक्ष लवू वारंग,माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,जिल्हा संघटक अनुप वारंग,तालुकाध्यक्ष सुशिल अशोक सावंत,वाघेरी सरपंच अनुजा राणे,पोलीस पाटील अनंत राणे,सागर वारंग,विनायक साटम आदींसह मराठा समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!