मसुरे (प्रतिनिधी): कोकणचा विकास टप्प्याटप्प्याने होत असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. देशाचे पंतप्रधान हे मालवण दौऱ्यावरती येत असून यावेळी त्यांनी कोकणच्या विकासासाठी भरघोस निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केली आहे. कोकणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने रखडलेल्या योजनांसाठी व प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने कोकण भूमी सुजलाम सुफलाम होईल. कोकणच्या विकासामध्ये अनेक प्रश्न अजून बाकी आहेत. यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग,मालवणबंदर, वेंगुर्लाबंदर,देवगड बंदर, सी वर्ल्ड प्रकल्प, सिंधुदुर्ग विमान सेवा असे अनेक प्रकल्प कोकण विकासाठी, व पर्यटन विकासासाठी आवश्यक आहे. दुबई, सिगापूर, मलेशिया यांच्या प्रमाणे देशाची आर्थिक प्रगती वाढीसाठी व बेरोजगारी दूर करण्यासाठी कोकणचा सर्वांगिण विकास निसर्गाचा समतोल राखून, त्वरित होणे आवश्यक आहे. हा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जिद्दीने करून भारताची जी डी पी मोठ्या प्रमाणात वाढवावी अशी मागणी मानवता विकास परिषद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र श्रीकांत सावंत यांनी केली आहे. 4 डिसेंबरला होणाऱ्या मालवण येथील कार्यक्रमात सर्व कोकणवासीयांना सामावून घेण्याची गरज आहे. हा कार्यक्रम राजकीय किंवा एखाद्या पक्षाचा न होता कोकण विकासासाठी न भूतो न भविष्यती असा व्हावा अशी मागणी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात श्रीकांत सावंत यांनी केली आहे.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा – श्रीकांत सावंत
