मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सहकार्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी मानले आभार
सुमारे ८०० विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वस्तूंची देण्यात आली माहिती ; मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले स्वागत
मालवण (प्रतिनिधी) : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बस फेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे केली होती. आ. वैभव नाईक यांच्या खास मागणीनुसार वस्तू संग्रहालयाची बस फेरी कुडाळ मालवण आणि कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आज हि बस मालवण शहरातील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवण येथे दाखल झाली.याप्रसंगी शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी बसचे स्वागत केले.एका मागणीवरून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाने बस पाठवून सहकार्य केले त्याबद्दल आ. वैभव नाईक यांनी त्यांचे आभार मानले. तसेच आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हि संधी उपलब्ध झाली त्याबद्दल या स्तुत्य उपक्रमाचे शिक्षक व पालकांनी कौतुक केले.
जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण,भंडारी हायस्कूल मालवण, फाटक शाळा मालवण आणि अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवण येथील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना म्युझियम ऑन व्हील्स टीमने प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती दिली.तसेच विद्यार्थ्यांना बसमध्ये संग्रहित असलेल्या वस्तू प्रत्यक्षात दाखवण्यात आल्या.शिवकालीन नाणी, दगडी हत्यारे, बाहुबली प्रतिकृती, कोल्हापुरी साज, लघुचित्र, चाकावरील पक्षाची मृण्मुर्ती, चंद्रगुप्त दुसरे यांचे नाणे,नक्षीदार वस्त्र अशा अनेक प्राचीन वस्तूंचा यात समावेश होता.हे सर्व पाहत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमलला होता.
यावेळी किरण वाळके, सन्मेष परब, पूनम चव्हाण, मीनाक्षी शिंदे, महेंद्र म्हाडगुत, उमेश मांजरेकर, करण खडपे, म्युझियम ऑन व्हील्स टीमचे चिन्मय गावडे, विनी प्रतिभा, शांतीनी सुतार, ओमकार डोंगरकर, मयूर भंडारे, शिवाजी तावरे आदी उपस्थित होते.
पुढील चार दिवस बस सिंधुदुर्गात : उद्या २१ फेब्रुवारी रोजी हि बस न्यू इंग्लिश स्कुल आचरा येथे जाणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी शिवाजी इंग्लिश स्कुल पणदूर तिठा, २३ फेब्रुवारी रोजी कुडाळ हायस्कुल, २४ फेब्रुवारी रोजी विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे हा कार्यक्रम होणार आहे.