वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हासह राज्यात आठवडाभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर खोकुर्ले, मांडुकली दरम्यान रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे रविवारी सायंकाळपासून हा मार्ग ठप्प झाला आहे. या मार्गावरील वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. तर कोकणातुन जाणारी वाहातुक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र दिवसभर पावसाचा जोर ओसरल्यामुळे सायंकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावरचे पाणी ओसरू लागले आहे.
गेल्या आठ दिवसापासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नदी नाल्यानी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गगनबावाडादरम्यान खोकुर्ले, मांडुकली, किरवे, लोंघे येथे रविवारी दुपारपासून रस्त्यावर पुराचे पाणी यायला सुरुवात झाली होती.सायंकाळी पासून गगनबावडा कोल्हापूर मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण, गोवा व पश्चिम महाराष्ट्राचा थेट असलेला संपर्क तुटल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली आहे. सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक कोल्हापूरातुनच राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. तर कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येणारी वाहतूक फोंडाघाट मार्गे राधानगरी अशी वळविण्यात आली आहे. माञ यामुळे वाहनचालकांना जास्त अंतर कापत प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेचा व आर्थिक भुर्दडही पडत आहे.