वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांनी प्रसंगावधान राखत कुसुर येथे नदिलगत कलंडलेल्या कारमधील चौघांचे प्राण वाचवले.शनिवार 27 जुलै रोजी रात्री 10 च्या सुमारास हुसेन लांजेकर हे आपले काम आटोपून मेहुणा जल्लाउद्दीन लांजेकर यांच्यासह स्वतःच्या कारमधून वैभववाडी हुन कोळपे च्या दिशेने जात होते. रात्रीच्या वेळी मुसळधार पावसात कुसुर नेवरेकर वाडी येथे रस्त्यालगत नदीपात्रानजीक एक कार कलंडलेली हुसेन याना दिसली. हुसेन यांनी तात्काळ त्या कारजवळ जात पाहणी केली असता कारमध्ये चौघे प्रवासी अडकलेले दिसले. त्या कारचे दरवाजेही आतून उघडत नव्हते. कारमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना हुसेन लांजेकर यांनी प्रसंगावधान राखत मेहुणा जल्लाउद्दीन याच्या साथीने कारमधून सुखरूप बाहेर काढले. कारमधील सर्व प्रवासी हे भुईबावडा मार्गे वैभववाडी च्या दिशेने जात होते.कुसुर नेवरेकर वाडी येथे चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत नदीपत्रालगत जाऊन थांबली. कारमधून बाहेर काढलेले सर्व प्रवासी सुखरूप होते. दरम्यान त्या प्रवाशांच्या मित्राने घटनास्थळ गाठत सर्वांना आपल्या वाहनातून पुढे मार्गक्रमण केले. हुसेन लांजेकर यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने त्या चारही प्रवाशांचे प्राण वाचले.
हुसेन लांजेकर यांचे प्रसंगावधान…चौघांचे वाचवले प्राण












