रिक्षा व्यावसायिकांनी व्यसनमुक्तीच्या प्रचाराचा केला संकल्प
जि. प. समाज कल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य- शाखा सिंधुदुर्ग यांचे विद्यमाने आयोजन !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : आज समाजामधील प्रत्येकासमोर मोठी प्रलोभने आहेत.कोणताही विचार न करता माणूस त्यांच्या आहारी जाऊन, उदासीनतेच्या – नैराशेच्या गर्तेत जाऊन व्यसनाधीन होतो. दारू – जुगार – गुटका – मटका इत्यादी व्यसनांच्या आहारी जाऊन कित्येकदा कुटुंब – संसार उध्वस्त होते. घरातील माणसे व्यसनाधीन सदस्याचा तिरस्कार करू लागतात .यातून सावरण्यासाठी नशाबंदी मंडळ, सिंधुदुर्ग शाखा आपल्याला सहकार्याची हाक देत असून पुढे आली आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांसह व्यसनमुक्तीच्या प्रचाराचे वाहक बनून स्वतःचे आणि समाजाला दिशा दाखवावी, असे मार्गदर्शक आवाहन संघटक अर्पिता मुंबईकर यांनी केले.
नशाबंदी मंडळ,महाराष्ट्र राज्य- मुंबई, शाखा सिंधुदुर्ग आणि फोंडाघाट एस.टी रिक्षा स्टॅन्ड व जि. प. समाज कल्याण विभाग च्या संयुक्त विद्यमाने “व्यसनमुक्तीचे बंधन, व्यसनापासून संरक्षण” या अभियांतर्गत ‘व्यसनमुक्तीची राखी’ बंधनाचा कार्यक्रम एसटी स्टँडवर घेण्यात आला. शुभारंभ पोलीस कॉन्स्टेबल वंजारी यांचे हस्ते रिक्षावर घोषवाक्य लावून करण्यात आला. यावेळी त्यांनी या अभियानाच्या प्रचारासाठी वचनबद्ध राहण्याचे सुचित केले. नशाबंदी सिंधू. जिल्हा समितीचे उपाध्यक्ष सुनील कांबळे यांनी प्रास्ताविक केले. स्टँडचे कंट्रोलर होळकर यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रवक्त्या मेघा गांगण यांनी समितीचे कार्य आणि आवश्यकता विशद करताना, आज आम्ही तुमच्यासमोर नशाबंदीचा हात पुढे केला आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार करून समाज नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन केले. समिती अध्यक्ष श्रावणी मतभावे यांनी व्यसनमुक्ती वरील कवितेतून रिक्षाचालक ग्रामस्थ यांना सजग केले. अर्पिता मुंबईकर यांनी सर्व उपस्थिताना व्यसनमुक्तीची शपथ दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना, रिक्षा चालक – ग्रामस्थ यांना व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात आली. आभार प्रदर्शन संयोजक राजेंद्र कदम यांनी केले.
यावेळी रुपेश मेजारी, सुहास सावंत, पारस कासले, लक्ष्मण गोसावी, संतोष चव्हाण, संजय पेडणेकर, संजय धुमक, अजय कार्लेकर, दिगंबर रावराणे, गणेश मराठे, प्रमोद रावराणे, रुपेश पाटील, एकनाथ पवार,प्रीतम घाडी, चंद्रकांत मडव, गजानन पेडणेकर, मोतेच पिंटो, किरण पेडणेकर, अजय चिके, भाऊ कुडतरकर, नीलकंठ रावराणे, भरत चीके, अजय कदम, बाळू पाटील, रवींद्र कदम, शुभम शेळके, संतोष खांडेकर, इत्यादी रिक्षा चालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.