कणकवली (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ‘डुप्लिकेट शिवसेने’त पक्षप्रवेश करून ‘चोरलेला धनुष्यबाण’ हाती घेतला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपच्या तिकिटावर खासदार असलेले त्यांचे वडील नारायण राणे आणि भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले त्यांचे धाकटे बंधू नितेश राणे हे सुद्धा उपस्थित होते. आपला पोरगा राजकीय सोयीसाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असताना अन्य पक्षात खासदार व आमदार असलेल्या बाप आणि भावाने उपस्थित राहणे ही राज्याच्या नव्हे तर एकंदरीतच देशाच्या राजकारणातील दुर्मिळ अशीच गोष्ट म्हणावी लागेल. राणे पितापुत्रांकडे ना कोणता राजकीय विचार आहे, ना कसली नैतिकता…! राजकारणात राहून स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या तुंबड्या भरणे हाच त्यांचा एकमेव विचार…!! अगदी सुरुवातीच्या काळात १९८५ ते २००५ साली शिवसेनेत असताना नारायण राणे हिंदुत्ववादी होते, २००५ ते २०१८ अशी पुढची तेरा वर्षे काँग्रेसमध्ये गांधी टोपी घालून ते सेक्युलर बनले आणि आता पुन्हा २०१८ ते २०२४ भाजपचे कमळ हाती घेऊन ते हिंदुत्ववादी बनले आहेत. २००५ साली त्यांनी शिवसेना पक्षाची धनुष्यबाण ही निशाणी कोकणात औषधाला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यांच्यावर नियतीने असा काही सुड उगवलाय की आता २०२४ साली तेच नारायण राणे आपले पुत्र निलेश राणे यांच्यासाठी गल्लोगल्ली फिरून शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार करीत आहेत. सरडा रंग बदलतो म्हणून नाहक बदनाम होत आहे. राणे पितापुत्रांनी सरड्यालाही लाजवेल त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने वेळोवेळी आपले राजकीय रंग बदलले आहेत. एकंदरीतच राजकीय क्षेत्राचा विचार केला असता राणे कुटुंबीय ही स्वार्थासाठी राजकीय बाप बदलणारी टोळीच आहे…!
निलेश राणेंच्या शिवसेना पक्षप्रवेशासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर साष्टांग दंडवत घालुन लोटांगण घालावे लागले. २००५ साली शिवसेना पक्ष सोडल्यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी त्यांनी वारंवार दिल्लीवारी करून सोनिया गांधी व अहमद पटेल आणि महाराष्ट्रात मार्गारेट अल्वा व प्रभा राव यांच्यासमोर लोटांगण घातले होते. त्यानंतर कॉंग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश मिळवण्यासाठी रात्रीच्या काळोखात गुजरातेत जाऊन मोदी-शहा व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घातले. मात्र यावेळी पुत्रप्रेमापोटी नारायण राणेंना एकनाथ शिंदेंसमोर लोटांगण घालायची वेळ आली. एकनाथ शिंदे सर्वप्रथम २००४ साली आमदार बनले. त्यावेळी नारायण राणे विरोधी पक्षनेते होते आणि त्याअगोदर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नारायण राणेंना तसे खुपच ज्युनिअर आहेत. आता त्यांच्यासमोर त्यांनी मुलाच्या पक्षप्रवेशासाठी आणि कुडाळ-मालवण मतदारसंघातील उमेदवारीसाठी अक्षरशः लोटांगण घातले आहे.
मध्यंतरी पुणे शहरातील पत्रकार परिषदेत ‘कपडे बदलावेत त्याप्रमाणे राणे पक्ष बदलतात’ असा खोचक प्रश्न विचारून एका महिला पत्रकाराने नितेश राणेंची बोलती बंद केली होती. आता पुन्हा एकदा राणेंनी आपल्या जुन्या सवयीप्रमाणे पक्ष बदलला आहे. २०१९ साली नारायण राणे भाजपचे खासदार होते, नितेश राणे कॉंग्रेसचे आमदार होते आणि निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस होते. अशा प्रकारे पाच वर्षांपूर्वी एकाच कुटुंबात तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षात कार्यरत असलेली ही संपुर्ण देशभरातील पिता-पुत्रांची अतिशय दुर्मिळ अशीच तिकडी होती. फरक इतकाच आहे की, २०१९ साली नारायण राणे धाकटे चिरंजीव नितेश राणे यांच्या भाजप प्रवेशासाठी दिल्ली व महाराष्ट्रात भाजप पक्षश्रेष्ठींचे उंबरे झिजवत होते आणि आता पाच वर्षानंतर २०२४ साली थोरले चिरंजीव निलेश राणेंच्या शिवसेना प्रवेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्याचे उंबरे झिजवले आहेत. नारायण राणेंना कोकणातील जनतेच्या सुखदुःखाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त आपल्या दोन्ही मुलांची राजकीय सोय लावायची आहे. मला वाटत कुडाळमध्ये बसून राणे पितापुत्रांनी दीर्घ चिंतन केले. खूप म्हणजे खूप अभ्यास केला. मग त्यांच्या लक्षात आले की गोळवलकरांच्या हिंदुत्वापेक्षा आनंद दिघेंचे हिंदुत्व चांगले आहे. मग ते धनुष्यबाणाचे उमेदवार झालेत. कोणतीही वैचारिक बांधीलकी नसणारे राणे कुटुंबीय हे राज्यभरात चेष्टेचा विषय बनलेले आहे. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सारखे-सारखे पक्ष बदलत राहायचे, हे त्यांच्या रक्तातच भिनलेले आहे. त्यांना वेळीच रोखले पाहिजे. त्यासाठीच येत्या विधानसभा निवडणुकीत बाप बदलणाऱ्या टोळीला जिल्ह्यातून हद्द्पार केले पाहिजे.