“खारेपाटणला डावलून ज्यांनी आपल्या मूळ गावी विकास निधी आणला. त्यांनी आम्हाला स्वार्थ शिकवू नये”
खारेपाटण (प्रतिनिधी) : “भारतीय जनता पार्टी पक्षात माझा दि.५ जून २०२४ रोजी झालेला पक्ष प्रवेश हा पैशाच्या हव्यासापोटी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी तसेच कुणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली झालेला नसून खारेपाटण गावचा मागील १० वर्षात खुंटल्या गेलेल्या विकासाला चालना मिळण्यासाठी झालेला असून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन केलेला असल्याची प्रतिक्रिया खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी भाजप पक्ष प्रवेशावर त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांनी नुकताच आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित कणकवली येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला होता. याबत टीका करताना व आपली प्रतिक्रिया देताना शिंदे गट कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी खारेपाटण सरपंच यांचा भाजप प्रवेश हा व्यक्तिगत स्वार्थासाठी व पैषाच्या हव्यसापोटी झालेला असल्याची. बोचरी टीका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली होती.
यावर उत्तर देताना खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी सांगितले, मंगेश गुरव यांनी आपल्या मूळ गववी हातदे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधी आणला. मात्र खारेपाटण गावासाठी निधी आणला नाही. ही येथील जनतेशी केलेली गद्दारी नाहीतर काय म्हणावे.? असा सवाल ईसवलकर यांनी व्यक्त केला. तसेच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना देखील खारेपाटण तालुक्याचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे व गावची विकासकामे स्थानिक आमदारांकडून
अडविली जातात असे म्हणणे यातून मंगेश गुरव यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते.
ज्यांना स्वतः ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी दोन वेळा पराभवाचा सामना पत्करावा लागला.अशा व्यक्तींनी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा मागणे हास्यस्पद आहे. कोणताही विजय हा सांघिक असतो. माझा सरपंच पदाचा झालेला विजय हा माझ्या गावातील ग्रामस्थानी माझ्यावर दाखवलेला विश्वासाचा विजय आहे.त्यामुळे सरपंच पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही. असे देखील सरपंच प्राची ईसवलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.
तसेच त्या पुढे म्हणतात माझ्या दीड वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे ही सर्वांच्याच नजरेसमोर आहेत. त्यामुळे मी माझे जूने सहकारी श्री मंगेश गुरव यांच्या टीकेला जास्त महत्व देत नाही. कारण विरोधकांशी संगणमत करून पर्यायी ग्रामपंचायत चालवण्याचा त्यांचा हेतू साध्य न झाल्याने व राजकीय,सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात गुरव हे अपयशी झाल्याने सद्या ते वैफल्यग्रस्थ झालेले आहेत. त्यामुळे श्री देव कालभैरव व श्री धनी रवळनाथ मंगेश गुरव याना सूदबुद्धी देवो हीच सदिच्छा…अशी टीका वजा प्रतिक्रिया खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.












