वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले अनेक वर्षे उद्धघटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या वैभववाडी पंचायत समिती इमारतीचे उबाठा सेनेच्यावतीने नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते अचानक उद्धघाटन करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आता काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी उबाठा सेनेच्यावतीने पंचायत समिती येथील गट शिक्षण अधिकारी कार्यालयाला लागलेल्या गळतीची पाहणी केली. यावेळी शिक्षण विभागाच्या कार्यालयातील दप्पतर प्लस्टिक कागद टाकून झाकून ठेवले आहे. यातील काही कागद पत्राचे गट्टे गळतीमुळे भिजत असून महत्वाचे कागद पत्र खराब होत आहेत. याबाबत सेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्याच्या शिक्षण मंत्र्याच्या जिल्ह्यात शिक्षण विभागाची अशी दुरावस्था झाली आहे. याला शिक्षण मंत्री जबाबदार आहेत. असा आरोप उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
कोट्यावधी रुपये खर्च करून पंचायत समितीची नवीन इमारत बांधली आहे. मात्र गेली दहा वर्षे ही इमारत विनावापर पडून आहे. इमारत असूनही कर्मचाऱ्यांना गळक्या इमारतीत बसावे लागत आहे. आमदार नितेश राणे यांच्या हट्टापायी इमारतीचे उद्धघाटन रखडले आहे.त्यामुळे आम्ही लोकांच्या व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आज या इमारतीचे उद्धघाटन आम्ही करीत असल्याचे अतुल रावराणे यांनी सांगितले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, रजब रामदूल तालुकाप्रमुख मंगेश लोके, स्वप्नील धुरी, दिगंबर पाटील, जितेंद्र तळेकर, सुनील कांबळे, यांच्यासह सेना पदाधिकारी उपस्थित होते.