खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या कणकवली तालुक्यातील जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या नवीन ४ वर्ग खोल्यांचे इमारत कामाचा शुभारंभ सोहळा तथा भूमिपूजन कार्यक्रम नुकताच खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
महाराष्ट्र शासन शिक्षण परिषद मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील आदर्श शाळा म्हणून खारेपाटण जि.प. केंद्र शाळा नं.१ या शाळेच्या अधिकच्या भौतिक सोयी सुविधा करिता नवीन ४ वर्ग खोल्यासाठी सुमारे ३५ लाख एवढा निधी प्राप्त झाला असून या नवीन इमारतीत स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब, व्हरच्युअल रूम,सुसज्ज अत्याधुनिक प्रयोगशाळा, ई लायब्ररी वाचनालय इत्यादीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती शाळेचे केंद्र मुख्यद्यापाक प्रदीप श्रावणकर यांनी सांगितले.
खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथील शाळेच्या नवीन इमारत भूमिपूजन सोहळा कार्यक्रमा प्रसंगी खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव, यांच्या शुभ हस्ते टिकाव मारून बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच रमाकांत, उपसरपंच इस्माईल मुकादम, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सुधीर कुबल, खारेपाटण सोसायटी व्हॉईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, संचालक-विजय देसाई, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले, धनश्री ढेकणे, मनाली होणाळे, शीतीजा धुमाळे, शा.व्य.स.अध्यक्ष प्राप्ती कट्टी, उपाध्यक्ष प्रियंका गुरव माता पालक संघाच्या उपाध्यक्ष संध्या पोरे, खारेपाटण रिक्ष संघटनेचे अध्यक्ष शेखर शिंदे, शेखर कांबळी, बांधकामांचे ठेकेदार उत्तम बिडये आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना रवींद्र जठार म्हणाले खारेपाटण केंद्र शाळा ही राज्यातील मॉडेल स्कूल म्हणून उदयास आलेली शाळा असून ती आमच्या विभगातील शाळा असल्याने तिचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.या शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर आणि त्यांची शाळा व्यवस्थापन समिती शाळेसाठी चांगले कार्य करत असून स्थानिक ग्रामस्थांचा देखील याला पाठिंबा आहे. शाळेची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच प्राची ईसवलकर, माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळेला शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार शाळेच्या सहायक शिक्षिका रेखा लांघी यांनी मानले.