वैभववाडीत आयोजित नागरी सत्कार समारंभात डावखरेंचे प्रतिपादन
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते निरंजन डावखरे यांचा करण्यात आला सत्कार
वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा उभारण्यावर यापुढे आपला भर राहणार आहे. सर्वांच्या सांघिक कामामुळेच तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली आहे. शिक्षण संस्थाचे वाढते वीज बिल हा विषय सध्या सर्वांना त्रासदायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजमध्ये लवकरच सोलर पॅनेल ची उभारणी करणार असल्याचे आश्वासन कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ऍड. निरंजन डावखरे यांनी दिले आहे.
वैभववाडी येथे महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आमदार निरंजन डावखरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, शिवसेना तालुकाध्यक्ष संभाजी रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, शारदा कांबळे, राजेंद्र राणे, सज्जनकाका रावराणे, वैभववाडी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वैभव रावराणे, माजी पं.स. सदस्य बाळा कदम, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, अक्षता डाफळे, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, संजय रावराणे, शरदचंद्र रावराणे व भाजपा पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पदवीधर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे, प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, संजय रावराणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
आ. निरंजन डावखरे म्हणाले, अन्याय तिथे नितेश राणे हे समीकरण भाजपमध्ये जुळले आहे. कणखर नेतृत्व म्हणून आ. नितेश राणे यांची ओळख आहे. ताकदीचे नेतृत्व या मतदारसंघाला मिळाले आहे. पुढे ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे संघटन कौशल्य उत्तम आहे. व ते सर्वांना सोबत घेऊन काम करत असल्याचे सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान प्रमोद रावराणे हे प्रत्येक वेळी आपल्याला माहिती देत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही सातत्य, संवाद व संपर्क ठेवूया व भाजपा ची ताकद अधिक मजबूत करुया असे डावखरे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात आपण शाळा व कॉलेजला बेंच उपलब्ध करून दिले. पुढच्या नंतरच्या टप्प्यात कॉम्प्युटर, डिजीटल शाळा, ई. क्लासरूम आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सद्यस्थितीत विज बिल वाढत असल्याने शिक्षण संस्थांच्या अडचणी वाढत आहेत. ग्रीन स्कूल ही संकल्पना राबवून प्रत्येक शाळेवर सोलर पॅनेल बसवणार असल्याचे डावखरे यांनी सांगितले. शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह बांधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
वैभववाडी भाजपा, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, अर्जुन रावराणे विद्यालय तसेच अन्य शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी आ. निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद रावराणे यांनी केले. यावेळी प्रभाकर सावंत, नासीर काझी, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय रावराणे यांनी तर भालचंद्र साठे यांनी मानले.