शालेय परिसरात वृक्षारोपण व वृक्षांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे रक्षाबंधन निमित्त वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रशालेच्या परिसरात असलेल्या वृक्षांना विद्यार्थीनींनी स्वतः तयार केलेल्या कागदी राख्या बांधण्यात आल्या. शिवाय शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. इयत्ता नववी ब च्या विद्यार्थीनींनी व इयत्ता सहावीची विद्यार्थीनी फिजा आरिफ आरवाडे या विद्यार्थीनीने आकर्षक कागदी राख्या तयार केल्या होत्या. प्रशालेच्या सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम प्रशालेत पार पडला.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही.एस.मरळकर, पी.बी.पवार आदी शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.