“देवाचिया द्वारीss उभा क्षणभरीsss. उत्साह -चैतन्य भक्तीभाव चा अवर्णनीय संगम– फोंडाघाटचा अखंड हरिनाम सप्ताह

राधा- कृष्णाच्या उदंड जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल- ताशांच्या गजरात फोंडाघाट मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी विसर्जनानंतर वेध लागतात, ते फोंडाघाट बाजारपेठेतील श्रीदेव राधाकृष्ण मंदिरातील “अखंड हरिनाम सप्ताह” चे ! संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांचे आकर्षण ठरणाऱ्या ह्या भक्तीमय उत्सव सोहळ्यानिमित्त परगावी असलेले फोंडावासीय, चाकरमानी, माहेरवाशिणी, अबाल वृद्ध या निमित्ताने गावी येऊन आपली सेवा राधाकृष्ण चरणी अर्पण करतात. भाद्रपद वद्य पंचमी ते एकादशी तथा चालू वर्षी तारीख २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान हा सोहळा पार पडत आहे.

भल्या पहाटे गणेशाच्या दैनंदिन नित्यपूजेनंतर अखंड हरिनाम सप्ताहाची घटस्थापना करण्यात आली. गावचे मानकरी आणि ग्रामस्थांनी देवाला सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित राहून हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गाऱ्हाणे – सांगणे केले. यामध्ये वैश्य समाजाचे पदाधिकारी, सदस्य, महिला- पुरुष वारकरी संप्रदाय आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
” हरिनामाचा गजर होतो फोंडा पेठेत ss” ” राधाकृष्ण माता अमुची उभी मंदिरातsss
मृदंग, टाळ, ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष झाला. उपस्थितीत अबाल वृद्ध हरिनामाच्या जयघोषात नाचू- गावू लागले. यावेळी बालगोपाळ मंडळातील कार्यकर्ते आणि सदस्यांचा सर्वंकष वावर आणि सहकार्याचे भूमिका लक्षवेधी होती. मंदिर व्यवस्थापनांकडून मंदिर – मूर्ती इत्यादीच्या साफसफाई आणि रंगरंगोटी तसेच बाल गोपाळ मंडळाकडून मंदिरासाठी देण्यात आलेले आठ झुंबर आणि फॅन्स सर्वांनाच सुखावत होते.

यानिमित्ताने विविध अध्यात्मिक, प्रबोधनात्मक, मनोरंजन -भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर आणि संपूर्ण बाजारपेठेला धावती मनमोहक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. नित्य पुजा-अर्चा, जीवनविद्या मिशन तर्फे उपासना यज्ञ, हरिपाठ कलावती आई मंडळाचे भजन, गोखले सर यांचे सुश्राव्य कथा- कीर्तन, वारकरी भजन, रात्री उशिरापर्यंत स्थानीक भजने तसेच विविध स्थानिक नेते पुरस्कृत डबलबारी,युवा- युवतींसाठी रेकॉर्ड डान्स आणि फनी गेम स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू, फुगड्या- नाच स्पर्धा अशा विविध उपक्रमांची रेलचेल या सप्ताहात असणार आहे. शेवटच्या तीन रात्री फोंडाघाट केंद्रशाळा, फोंडा हायस्कूल- कॉलेज तसेच बाल गोपाळ मंडळाची “रंगीत संगीत दिंडी” या शब्दाचे आकर्षण आहे.

सलग दहाव्या वर्षी आर. के. ग्रुप, फोंडाघाट तर्फे अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने तारीख २२ ते २४ सप्टेंबर रात्री आठ वाजता, तीन दिवशी जिल्ह्यातील नामवंत भजन मंडळांमध्ये “संगीत भजन स्पर्धा २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आर.के ग्रुप फोंडाघाट यांचेशी संबंधितानी संपर्क साधावा. तसेच भजन रसिकांनी- भाविकांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन आर. के. ग्रुप यांचे कडून करण्यात आले आहे संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह मध्ये सर्व भाविकांनी सहभाग घेऊन आपली सेवा रुजू करावी असे आवाहन श्री देव राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज पदाधिकारी व सदस्यांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!