सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास यापूर्वी कधीच झालेला नाही, हे मोदी @ ९ अभियान अंतर्गत स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर सहयोगी पक्षाचे मिळून ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येणारं आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगले काम केले असून त्या कामावर आपण समाधानी आहोत, असे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकसभा प्रवास योजनेचे निरीक्षक तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झालेल्या या योजनेंतर्गत मिश्रा यांचा हा ३ दौरा असून त्यांनी आज पक्षीय कार्यकर्ते आणि जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय योजनांचा आढावा घेतला. त्यांनतर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव प्रमोद जठार, लोकसभा प्रवास योजना संयोजक तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, राजू राऊळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.












