वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली – बोरवली व्हाया वैभववाडी ही एसटी फेरी गुरुवारपासून सुरू झाली आहे. सायंकाळी ४ वाजता या गाडीचे वैभववाडी बसस्थानकात आगमन झाले. आगमन होताच प्रवासी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. वैभववाडी – मुंबई, बोरवली एसटी सेवा सुरू करा अशी अनेक वर्षापासून स्थानिक प्रवाशांची मागणी होती. अनेक वर्ष या गाडीच्या प्रतीक्षेत प्रवासी होते. भारमान कमी असल्याचे कारण सांगत ही गाडी अनेक वर्ष बंद होती. ५ ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी बसस्थानकाला भेट देत समस्या जाणून घेतल्या. दरम्यान प्रमोद रावराणे यांनी वैभववाडी – मुंबई एसटी सुरू करा अशी मागणी केली. तालुक्यातून मुंबई ला जाणारी एकही गाडी नसल्याने आ. राणे यांनी नाराजी व्यक्त केली. सदर गाडी तात्काळ चालू करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांच्या सूचनेनंतर ही गाडी सुरू झाली आहे.
कणकवलीतून ही गाडी दुपारी ३ वाजता सुटेल, वैभववाडी बसस्थानकात ४ वाजता गाडी येणार आहे. तसेच या गाडीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा. असे आवाहन वैभववाडी वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांनी केले आहे.