दीपक रावराणे यांचे लाखोंचे नुकसान
वैभववाडी (प्रतिनिधी) : सांगुळवाडी खालची राववाडी येथील शेतकरी दीपक बळीराम रावराणे यांच्या मालकीची गाभण म्हैस (मुरा जातीची) जमीनीवर खाली पडलेल्या वीज वहिनीला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यूमुखी पडली. यामुळे त्यांचे सुमारे लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवार दुपारी घडली.
रावराणे यांच्याकडे मुरा जातीच्या म्हैशी आहेत. शनिवार दुपारी त्यांनी म्हैशी चरण्यासाठी गोठ्यातून सोडल्या. गोठ्या पासून काही अंतरावर वीज वाहिनी तुटून पडली होती. या वाहिनीला यातील एका म्हशीचा स्पर्श झाला. विज वाहिन्या विद्युत भारित असल्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून म्हैस जागीच गतप्राण झाली. सुदैवाने अन्य म्हैसी वाहिन्यापासून काही अंतरावर असल्यामुळे या अपघातातून बचावल्या आहेत. घटनेचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कर्पे, वीज वितरणचे अभियंता व कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
अचानक वीज वाहिनी तुटून पडण्याच्या या घटनेमुळे जीर्ण विद्युत वाहिन्याच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वीज वाहिन्यांना सुरक्षितेची खबरदारी म्हणून घेण्यात येणारी गार्डिंग केली नसल्यामुळे वीज वाहिनी तुटून पडल्यानंतरही त्यातून विद्युत प्रवाह सुरू राहिल्यामुळे हा अपघात घडला आहे. यामुळे वीज वितरण च्या कारभाराबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या व खांब बदलण्यात यावेत. अशी मागणी केली जात आहे.