वैभववाडी (प्रतिनिधी) : एकीकडे करूळ घाट गेले वर्षभर बंद आहे.तर गेल्या दोन महिन्यापासून भुईबावडा घाटातील एस टी बस वाहतूक सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठया गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी अवजड वाहतूक सुरु आहे. मग एस टी वाहतूक बंद का? असा प्रश्न प्रवाशांनाकडून केला जात आहे.भुईबावडा घाटातून रात्रीची एस टी बस वाहतूक सुरु करावी अशी मागणी प्रवशानाकडून केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून करुळ घाटातील रुंदीकरण कामामुळे बंद असणारी एसटी वाहतूक भूईबावडा घाटमार्गे सुरु होती मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसामुळे भुईबावडा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. तसेच एका ठिकाणी असलेली मोरी वाहवून गेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घाटातील दुरुस्तीची कामे करून वाहतूकीस मोकळा केला. रात्रीची एस टी वाहतूक वगळून अन्य वाहनाना वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र त्यानंतर रोज अवजड वाहनांसह शेकडो वाहने या घाटातून दिवसरात्र मार्गक्रमण करत आहेत . मात्र सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवलेली प्रवाशी एस टी वाहतूक अद्यापही सुरु करण्यात न आल्याने तळोकणातील प्रवासी वर्गाची मोठी गैरसोय झाली असून संतप्त प्रतिक्रीया कोकणातील प्रवाशातून व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणेच्या लाल फितीचा फटका हजारो प्रवाशाना बसत आहे. मात्र याबाबत ना प्रशासन गंभीर ना लोकप्रतिनिधी त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. तळकोकणातील जनता आजही आरोग्य, शिक्षण, व्यापार, खरेदी यासाठी कोल्हापूरला ये जा करीत असतात. सकाळी गेले की दिवसभर कोल्हापूर येथील काम आटपून सायंकाळी परत निघतात. मात्र घाटातील वाहतूक सहा नंतर बंद होत असल्यामुळे कोल्हापुरहून तळकोकनात येणाऱ्या प्रवाशांची पंचायत होत आहे. वैभववाडी तालूक्यासह शेकडो प्रवाशांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. भूईबावडा घाटमार्ग सायंकाळनंतर केवळ एस टी वाहतूकीसाठी बंद राहात असल्याने कोल्हापूरहून गगनबावड्यापर्यंत आलेल्या तळकोकणातील प्रवाशाना आपल्या भागातून रीक्षा किंवा अन्य वाहन बोलावून घेवून मगच तळकोकणात मार्गस्थ व्हावे लागत आहे.त्यामुळे प्रवाशांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. भूईबावडा घाटमार्ग जेव्हा प्रशासनाने सुरक्षेचे कारण देवून रात्रीच्या वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जनतेवर लादला तेव्हा जनतेच्या गैरसोयीचा विचारच केला गेला नाही वास्तविक रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धावणारी अवजड वाहने बंद ठेवून प्रवाशी एस टी वाहतूक दिवसरात्र चालू ठेवणे गरजेचे असताना प्रवाशी वाहतूक बंद ठेवून बेकायदेशीर चालणारी अवजड वाहतूक चालू ठेवण्यात आली . या निर्णयाचा सर्वाधिक फटका तळकोकणातील सर्वसामान्य जनतेला बसला हा अन्याय आतातरी त्वरीत दूर करावा अशी मागणी होत आहे. चौकट उंबर्डे माजी सरपंच सरपूद्दीन बोबडे यांनी याबाबत एस. टी. विभाग नियंत्रकांना निवेदन दिले असून रात्रीच्या वेळी एस टी वाहतूक सुरु करण्याची मागणी केली आहे.